शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त करणा-यां गुन्हे दाखल करा
गावगुंडांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप
सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तेजापूर येथील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीकांची आमलोनच्या काही लोकांनी नासधूस केली होती. 26 जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणी पीडित शेतक-यांनी मुकुटबन पोलीस स्टेशनला जाऊन आरोपीविरोधात तक्रार दिली होती. मात्र त्यांच्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य किसानसभेच्या वतीने आज पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
सविस्तर असे की, तेजापूर येथील दलित आदिवासी व इतर मागासवर्गीय गैर आदिवाशीस हे गेल्या 30 वर्षांपासून अडेगाव येथील खंड क्र. 2 वर अतिक्रमण करून शेती करीत आहे. या जमिनीचा पट्टा मिळावा म्हणून किसानसभा सतत आंदोलन करीत आहे. तसेच तेजापूर येथील शेतकऱ्यांनी पट्टा मिळण्याकरिता त्याचा दावा अर्ज संबंधित विभागास पाठविला आहे. त्यावर अजूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. शिवाय सदर शेतकऱ्यांना जमिनीवरून बेदखल करण्याचा कोणत्याही धोरणात्मक निर्णय झालेला नाही.
दरम्यान 26 जुलै रोजी आमलोनच्या काही लोकांनी या शेतामध्ये बळजबरीने घुसून त्यांच्या उभ्या पीकांमध्ये बकऱ्या चारून व रोपटे उपटून पिकांची नासधूस केली. त्यामुळे सदर गावगुंडांविरुद्ध प्रचंड संताप उफाळला आहे. याबाबत पोलीस स्टेशन मुकुटबन मध्ये तक्रार सुद्धा दिली होती मात्र यावर पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे मुकुटबन पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहे असा आरोप किसानसभेने केला आहे.
मुकुटबन पोलीस विभाग राजकीय लोकांच्या दबावात येऊन कामात हलगर्जीपणा करीत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना अटक करण्यात विलंब होत आहे. पीक उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना त्वरित अटक करा अन्यथा मुकुटबन पोलीस स्टेशन समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू प्रसंगी पोलीस स्टेशनला घेराव घालू असा इशारा किसान सभेतर्फे देण्यात आला आहे. यावेळी कॉ. शंकरराव दानव कॉ. ऍड. दिलीप परचाके, कॉ. मनोज काळे यांच्यासह रक्तदान महादान फाऊंडेशनचे अध्यक्ष मंगेश पाचभाई व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा: