वनोजादेवी येथे विद्युत उपकेंद्र देण्यात यावे
जि.प. सदस्य अरुणा खंडाळकर यांचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन
भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात वारंवार होत असलेला खंडीत वीजपुरवठा, कमी दाबाचा वीजपुरवठा यामुळे तालुक्यातील वनोजादेवी येथे नव्याने विद्युत उपकेंद्र देण्यात यावे अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे जि.प. सदस्य अरुणा खंडाळकर यांनी केली आहे.
मार्डी येथे 33 केव्ही चे विद्युत उपकेंद्र आहेत. या विद्युत केंद्रावरून मार्डी परिसरामध्ये येणाऱ्या गावांना वीजपुरवठा केला जातो. या विद्युत फिडरवर अनेक गावांचा समावेश असल्याने परिसरातील गावांना खंडीत वीजपुरवठा होत असतो. अनेकवेळा परिसरातील नागरिकांना विनाकारण अख्खी रात्र अंधारातच काढावी लागते. या परिसरातील विद्युत फिडरवर कधी राजूर वरून तर कधी वणी वरून विद्युत जोडला जातो. पण तो काही काळापुरताच असतो. त्यामुळे येथील नागरिकांना नेहमी अंधाराचाच सामना करावा लागतो.
शेतीच्या हंगामात तर शेतकऱ्यांना विजेची वाट पाहत अख्खी रात्रच शेतामध्ये काढावी लागते. या सर्व समस्यांचा विचार करून तालुक्यातील वनोजादेवी येथे विद्युत उपकेंद्र मंजूर करण्यात यावे अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जि.प. सदस्य अरुणा खंडाळकर यांनी केली आहे.
हे देखील वाचा:
खुमासदार राजकीय टोलेबाजीत रंगला पतसंस्थेचा शाखा उद्घाटन सोहळा
भाजप नगरसेवकाच्या काँग्रेस प्रवेशाने शहरात भाजपला मोठे भगदाड