मुकुटबन येथील तरुणांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस
परिसरातील कंपनी व कारखान्यात स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुशिक्षित व प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांनी नोकरीत स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याचा आरोप करत मुकुटबन येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. 288 सुशिक्षित बेरोजगारांना जोपर्यंत कायमस्वरुपी रोजगार दिला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान मंगळवारी उपोषण मंडपात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार याच्या सह तहसीलदार गिरीश जोशी, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, भाजपचे तालुका अध्यक्ष सतीश नाकले यांनी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या ऐकूण घेतल्या.
नियमांप्रमाणे कंपनीत स्थानिकांना रोजगार देणे बंधकारक असल्यावरही परिसरातील कोळसा खाण, सिमेंट कारखाना व इतर कंपनीत डिग्री किंवा डिप्लोमा नाही असे सांगत बाहेरील व्यक्तींना रोजगार दिला जात आहे. तसेच या कंपनीत मोठ्या प्रमाणात राजकीय नेते, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या नातेवाईकांचा भरणा करण्यात आला आहे. या विरोधात आझाद उर्फ गजानन उदकवार, पंढरी धांडे, सुनील जींनावार, उमेश पोतराजे, अनुप दगडी हे तरुण आमरण उपोषणला बसले आहे. कंपनीत वरिष्ठ पदावर असलेल्या अधिका-यांनी आपल्या नातेवाईंना नोकरी देऊन स्थानिकांचा रोजगार खाल्याचा आरोप देखील उपोषणकर्त्यांचा आहे.
बी एस इस्पात कोळसा खाणीतील एका अधिका-याने स्थानिक तरुणांना कामावर घेतो असे म्हणत अनेक तरुणांची ड्रायव्हिंग ट्रायल घेतली. परंतु 6 महिने लोटूनही त्यांना अद्याप कामावर घेण्यात आलेले नाही. तर एक युवकाला नोकरी देतो असे सांगून त्याला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास लावला. मात्र अद्याप नोकरी दिली गेली नाही. असा आरोपही होतोय.
परिसरातील कंपनीत स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार द्यावा, तालुक्यातील अकुशल असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना शिबिर घेऊन प्रशिक्षण द्यावे तसेच प्रशिक्षण केंद्राची स्थापना करावी, सर्व कामगारांचा विमा काढावा इत्यादी मागण्या आंदोलकांच्या आहे. दरम्यान उपोषण सुरू होताच काही अधिकारी सुट्टीवर गेल्याची माहिती आहे.
उपोषणाची सुरवात होताच तालुक्यातील शेकडो तरुणासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या सोबत सरपंच निलेश येल्टीवार, राहुल दांडेकर हरिदास गुर्जलवार यांनी भेट देऊन तरुणांच्या समस्या जाणून घेतल्या तर मुकुटबन ग्रामपंचायत सरपंच मीना आरमुरवार सदस्य बबिता मुदमवार सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे, संतोष बरडे सह व्यापारी, शिक्षक व विविध पक्षाचे अध्यक्ष यांनी भेटी दिल्या. शिवक्रांती कामगार संघटना व विविध संघटनेनी व पत्रकारांनी पाठिंबा दिला आहे.
हे देखील वाचा: