9 ऑगस्टला मोदी सरकारच्या विरोधात डेरा डालो आंदोलन
किसान सभा व सीआयटीयूतर्फे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
पुरुषोत्तम नवघरे, वणी: मोदी सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात सोमवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी वणीत डेरा डालो आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलन हे तहसील कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे. कॉ. शंकर दानव व कॉ. दिलिप परचाके यांनी आज शुक्रवारी वणीतील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आंदोलनाचे आयोजन महाराष्ट्र किसान सभा व सीआयटीयू तर्फे करण्यात आले आहे.
मोदी सरकारच्या सध्याच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक परिस्थिती बिघडली असून महागाई व बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. देशात शेतक-यांचे 8 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. असा विविध धोरणांमुळे देशाचे नुकसान होत असल्याने क्रांतीदिनी हे आंदोलन पुकारून मोदी सरकारला चले जावचा इशारा देण्यासाठी हे निदर्शने आंदोलन होणार असल्याची माहिती देण्यात आली.
कृषी कायदे रद्द करा, वीज बिल विधेयक मागे घ्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी मान्य करा, गरीब, कामगार तसेच आशासेविका, अंगणवाडी सेविका यांची वेतनवाढ करावी, वाढती महागाई कमी करावी इत्यादी मागण्या आंदोलकांच्या आहेत. सदर पत्रकार परिषदेत कॉ. शंकरराव दानव, कॉ. दिलिप परचाके यांच्यासह किसान सभा व सीआयटीयूचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा:
पोलिसांचे नवीन सुंदर’कांड’, बडग्याच्या कोंबडबाजारासाठी ऍडव्हांस बुकिंग?