भास्कर राऊत, मारेगाव: खर्रा खाण्यासाठी गेलेले एका इसमास शुल्लक वादावरून मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस शुक्रवारी 6 ऑगस्ट रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मारेगाव एन.पी. वासाडे यांनी शिक्षा सुनावली आहे. रुपेश सुधाकर बोधाने रा. हटवांजरी ता. मारेगाव असे आरोपीचे नाव असून त्याला मारहाण व धमकी दिल्या प्रकऱणी सहा महिने कारावास व 3 हजारांचा दंड सुनावण्यात आला आहे.
मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या हटवांजरी 7 ऑगस्ट 2018 रोजी संध्याकाळी फिर्यादी गावातील एका पानठेल्यावर खर्रा खाण्यासाठी गेला होता. त्यावेळी काही लोक पानठेल्यापुढे पत्ते खेळत होते. दरम्यान फिर्यादी देखील पत्ते खेळण्यासाठी बसला. मात्र त्यावेळी आरोपी रुपेश सुधाकर बोधाने याचे वडील तिथे आले व ते पत्ते घेऊन निघून गेले. त्यावर फिर्यादीने आरोपी रुपेशला पत्ते का उचलले याबाबत विचारणा केली.
विचारणा केल्याच्या रागातून आरोपीने पानठेल्यावरील खर्रा घोटण्याची पाटी घेऊन फिर्यादीला मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादच्या डाव्या डोळ्याचे खाली मार लागला व रक्त निघाले. तसेच आरोपीने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून फिर्यादीने मारेगाव पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात भादंविच्या कलम 324, 504, 506 अन्वये गुन्हा नोंद केला.
सदर प्रकरणाचा जमादार रामकृष्ण वेटे यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने फिर्यादी, डॉक्टर पी.एस. वानखडे व तपास अधिकारी जमादार रामकृष्ण वेटे यांच्यासह 9 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती.
साक्षदारांचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी रुपेश सुधाकर बोधाने यांला सहा महीने कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सहाय्यक सरकारी वकील पी डी कपूर व कोर्ट पैरवी जमादार ढुमणे यांनी काम पाहिले.
हे देखील वाचा:
उपोषण मंडपात आमदार व काँग्रेस तालुका अध्यक्षांमध्ये शाब्दिक खडाजंगी