मार्डी येथे विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
सततची नापिकी आणि कर्जाबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
भास्कर राऊत, मारेगाव: सततची नापिकी आणि वाढत असलेले कर्जाच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गजानन हरी निमसटकर वय अंदाजे 72 असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असूनते मार्डी येथील रहिवाशी होते.
मार्डी येथील प्रतिष्ठीत गजानन निमसटकर यांच्याकडे 8 एकर शेती आहेत. त्यातील तीन एकर त्यांनी पत्नीच्या नावाने करायचे ठरवले होते. परंतु अजूनपर्यंत शेतीची फोड झालेली नव्हती. यावर्षी पडत असलेला सततचा पाऊस त्यामुळे त्यांना शेतीमध्ये मोठा फटका बसला होता. सोयाबीन आणि कपाशी पिकाला मोठा आर्थिक फटका बसताना पाहून त्यांना धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
रविवारी दि. 19 सप्टेंबरला गजानन हे नेहमीप्रमाणे दुपारी बाजार चौकामध्ये बसून होते. त्यांचा मुलगा अजय हा घरी जाऊन बाबा कोठे गेले म्हणून विचारल्यावर ते बाजारवाडीकडे गेले असे कळले. नंतर बाजारवाडीकडे जाऊन बघितले तर बाबा घराकडे गेले असे सांगितले. यावरून मुलाच्या मनामध्ये संशय आला. त्याने गावातीलच गायधन यांना घेऊन बुद्ध विहाराजवळ असलेल्या शेताकडे गेले. तर तिथे असलेल्या विहिरीच्या काठावर जोडा, शर्ट, लुंगी आणि काठी आढळून आली.
यावरून संशय येऊन त्यांनी विहिरीजवळ जाऊन बघीतल्यावर त्यांना वडीलांचे प्रेत विहिरीमध्ये तरंगत असलेले दिसले. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील डॉ. प्रशांत पाटील यांना याविषयी माहिती दिली. त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनिवरून माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी मारेगाव येथे आणला. बातमी लिहिपर्यंत त्यांचे शवविच्छेदन व्हायचे होते.
परिसरात दानशूर व्यक्ती म्हणून ओळख
गजानन निमसटकर हे एक दानी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध होतं. त्यांनी मार्डी येथील बुद्धविहाराला 3 हजार स्क्वेअर फूट जमीन दान दिलेली आहे. तसेच सर्वांशी मिळून मिसळून राहणारे म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत.
हे देखील वाचा:
Comments are closed.