आरसीसीपीएलच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

प्रकल्पग्रस्त युवकाच्या आत्महत्येस कंपनी जबाबदार असल्याचा आरोप

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील प्रकल्पग्रस्त तरुण शेतकऱ्यांनी गुरुवार 13 जाने. रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करणारा गिरीश परसावार या युवकाच्या खिशातून एक सुसाईड नोट मिळाली होती. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी आरसीसीपीएल कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर आरसीसीपीएल कंपनी विरोधात सुरू असलेले आंदोलन आणखी चिघळणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने आरसीसीपीएल कंपनीतील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले आहे.

प्रकल्पग्रस्तांना कायम नौकरी देण्याचे आश्वासन देऊनही त्यांच्या पाल्याना नौकरी देण्यात टाळाटाळ केली जात आहे. सिमेंट प्रकल्पात शेतजमीन देणाऱ्या मुकुटबन येथील 20 शेतकऱ्याच्या पाल्यांची यादी कंपनीकडे देण्यात आली होती. प्रकल्पग्रस्त शेतकरी मुलांना योग्यतेनुसार कायम नौकरी देण्याची मागणी वरून मागील 15 दिवसापासून आरसीसीपीएल कंपनीच्या प्रवेशद्वार समोर उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

मृतक गिरीश परसावारही आंदोलनात सहभागी होता. मात्र आरसीसीपीएल प्रबंधनकडून आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नैराश्याने ग्रस्त होऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र गिरीश सत्यनारायण परसावार यांनी आत्महत्या केली होती.

प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे दिनेश बरलावार, वासुदेव विधाते, मनोज अकीनवार, राजेश बोल्लीवार, दत्तात्रय चिंतावार, गणेश आसुटकार, विनोद चिंतावार, गणपत बच्चेवार, गजानन बच्चेवार, पुरुषोत्तम खिरटकर व इतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुकुटबन पो.स्टे. चे ठाणेदार अजित जाधव यांना निवेदन देऊन दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हे देखील वाचा:

मेंढोली गावात अवैध दारूविक्रीला उधाण, गावकरी संतप्त

आधी मीच राहणार आतला…. गर्भवती झाल्यावर मी नाही त्यातला…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.