मनसे कडून पूरग्रस्तांना अन्नधान्याचे वाटप
रोटरी क्लब व व्यापारी असोसिएशनचाही मदतीसाठी पुढाकार
जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात नैसर्गिक आपत्तीची सर्वाधिक झळ कोना या गावाला बसली. येथील 849 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले तर 45 जनावरांना हलविण्यात आले होते. सध्या पूरपरिस्थिती नियंत्रणात असून बधितांना मदतीची नितांत गरज लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकरांनी पंधरा दिवस पुरतील एवढे अन्नधान्याचे वाटप गुरुवारी केले.
तालुक्यातील रांगणा, भुरकी, जुनी सावंगी, जुनाड, शेलु (खु), झोला, कोना, उकणी अशा अकरा गावात पुराने थैमान घातले होते. वर्धा नदी चांगलीच कोपली होती त्यातच धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग यामुळे नदीची पाणीपातळी कमालीची वाढली. पुराने थैमान घातले, सर्वत्र दाणादाण उडाली. 11 गावात पाणी शिरले, 28 हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्याने अवघ्या काही वेळातच होत्याचे नव्हते झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पहिल्या टप्प्यात कोना येथील नागरिकांना धान्याचे किट व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या किट मध्ये तांदुळ व पीठ प्रत्येकी 5 किलो, साखर, तुर दाळ प्रत्येकी 1 किलो, साबण, चहापत्ती, तेल, मीठ, मसाला, माचिस आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
रोटरी व व्यापारी असोसिएशनचा पूरग्रस्तांसाठी पुढाकार
रोटरी क्लब ऑफ डायमंड सिटी व व्यापारी असोसिएशनने वणी तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी येथील बाजोरिया लॉनमध्ये धान्यपेढी उघडली आहे. ज्या दानदात्यांना धान्य, कपडे अथवा गरजेचे साहित्य पूरग्र स्तांसाठी द्यायचे असेल त्यांनी येथील बाजोरिया लॉनमध्ये 26 जुलैपर्यंत सकाळी 11 ते 5 या वेळात साहित्य आणून द्यावे, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष निकेत गुप्ता व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा यांनी केले आहे. यापूर्वीदेखील केरळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब व व्यापारी असोसिएशनने वणीतून मोठ्या प्रमाणावर मदत पाठविली होती.
तालुक्यातील कोना 849, झोला 551, उकणी 415, भुरकी 51, रांगणा 95, जुनाडा 21, शेलू (खु) 15, कवडशी 4, शिवणी 18, चिंचोली 52 अशा 2071 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. आता पूरपरिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे स्थलांतरित नागरिक आपापल्या गावी परताताहेत. पूर पीडितांना जीवनावश्यक साहित्य व औषधीची मदत गरजेची झाली आहे.
हे देखील वाचा:
पुराने घेतला शेकडो पशूधनाचा जीव, रात्रीत झाले होत्याचे नव्हते…
Comments are closed.