भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यात शुक्रवार, शनिवारी आणि रविवार अशा सलग तीन दिवस आत्महत्येच्या घटना घडल्या. शुक्रवारी म्हैसदोडका येथे एका विवाहित तरुणाने कीटकनाशक प्राशन केले. शनिवार नरसाळा येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली तर रविवारी एका शेतक-याने विष प्राशन करून आत्महत्या केली. सतीश बोथले असे म्हैसदोडगा येथील मृतकाचे नाव आहे. गजानन नारायण मुसळे वय 28 असे नरसाळा येथील मृतक तरुणाचे नाव असून दांडगाव येथील शेतक-याचे तोताराम अंगद चिंचोलकर वय 45 वर्ष असे नाव आहे. सातत्याने आत्महत्येच्या घटना मारेगाव तालुक्यात घडत असतानाही अद्यापही प्रशासकीय स्तरावर कोणत्याही विशेष उपाययोजना होताना दिसत नाही.
सविस्तर वृत्त असे की, तोताराम अंगद चिंचोलकर वय अंदाजे 45 वर्ष हे दांडगाव येथील रहिवाशी होते. तोताराम व यांच्या वडिलांच्या नावाने दांडगाव येथे 23 एकर सामाईक शेती आहे. ते शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. विशेष म्हणजे ते गावाचे माजी उपसरंपच देखील होते. दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोज रविवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या राहत्या घरी किटकनाशक प्राशन केले.
याची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने उपचारांसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकूर्ती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे नेण्यात आले. रविवारपासून त्यांच्यावर चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र मध्यरात्री रात्री 12:30 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. तोताराम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अजुन गुलदस्त्यात आहे.
गजानन नारायण मुसळे (28) हा नरसाळा येथील रहिवाशी होता. गजाननकडे 8 एकर सामायिक शेती आहे. यासोबत तो जनावरे चारण्याचे काम करायचा. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी तो जनावरांना चारण्यासाठी जवळील शेतात नेले होते. त्यानंतर त्याने शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतला. गजानन मुसळे याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. परंतु लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच त्याची पत्नी त्याला सोडून गेली. तेव्हापासून तो हताश राहायचा. त्यातच शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न होते. त्याच्या मागे आईवडील, एक लहान भाऊ असा अप्तपरिवार आहे. या प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
म्हैसदोडका येथील सतीष वासूदेव बोथले (30) या विवाहित तरुणाने शुक्रवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास राहत्या घरी विष प्राशन केले. सतीषला तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सतीश हा अल्पभूधारक शेतकरी होता.
सततच्या आत्महत्या कधी थांबणार?
मारेगाव तालुक्याची ओळख आता आत्महत्येचा तालुका अशी होत आहे. दर आठवड्यात 4-5 आत्महत्येच्या घटना तालुक्यात घडत आहे. पोळा, तान्हा पोळा अशा सणावाराच्या दिवशी देखील आत्महत्येच्या घटना घडताना दिसत आहे. मात्र अद्यापही प्रशासकीय स्तरावर या तालुक्यासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांनी आता यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
हे देखील वाचा:
Breaking News: विस्फोटक वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात, एक ठार
महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी गणेश मॉल येथे भव्य लकी ड्रॉ योजना
Comments are closed.