पुन्हा पाटाळ्याचा पुलावरून पाणी, वरोरा-नागपूर जाणारी वाहतूक बंद

या पावसाळ्यात तिस-यांदा पूल पाण्याखाली, घुग्गुसमार्गे वाहतूक सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: संततधार पावसामुळे बेंबळा प्रकल्प, अप्पर वर्धा इ. धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून त्यामुळे पाटाळा येथील पुलावरून पाणी वाहत आहे. पूर आल्याने सोमवारी संध्याकाळपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे वरोरा तसेच नागपूर येथे जाणारी वाहतूक चांगलीच प्रभावित झाली आहे. सध्या घुग्गुस मार्गे वाहतूक सुरू आहे. या पावसाळ्यात तिस-या वेळी पाटाळ्याचा पूल पाण्याखाली आला आहे.

शनिवारी दिनांक 10 सप्टेंबरच्या रात्री पासून वणी आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रविवारी आणि सोमवारी पावसाची रिपरिप सुरूच होती. परिणामी नदी आणि नाले दुथडे भरून वाहत आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आला आहे. सोमवारी दुपार पासून वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हायला सुरुवात झाली. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास पाटाळा येथील पुलाला नदीचे पाणी टेकले. रात्री 6.30 वाजताच्या दरम्यान पुलावरून पाणी वाहायला सुरूवात झाली. त्यामुळे पोलीस  प्रसासनाने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. 

एकाच सिजनमध्ये तिस-यांदा पूल पाण्याखाली
पाटाळ्याचा पूल हा या पावसाळ्यात तीनदा पाण्याखाली आला आहे. जुलै महिन्यात 6 दिवस या मार्गावरील वाहतूक बंद होती. तर ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरानंतर 4 दिवस या मार्गावरील वाहतूक बंद होती. आता तिस-यांदा हा पूल पाण्याखाली आला आहे. पूल तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच तीनदा पूल पाण्याखाली आला आहे. दरम्यान नदीच्या तिरावर असलेले वेदा या रेस्टॉरन्टचा एक माळा पाण्याखाली आला आहे. सध्या पुलाच्या पाच फूट वर पाणी असल्याची माहिती आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुलाच्या आधी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.  

पुलाआधी वणी पोलिसांचा चोख बंदोबस्त

पावसाची रिपरिप सध्या थांबली असून वणी शहरात आज उन्ह पडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नदीला जरी पूर आला असला तरी अद्याप कोणत्याही गावाला पुराचा धोका नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एकाच सिजनमध्ये सलग तिस-यांदा पुराचा सामना करावा लागला असल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. सध्या पाटाळ्याचा पूल बंद असल्याने वरोरा व नागपूरसाठी घुग्गुस मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

हे देखील वाचा: 

मारेगाव तालुक्याला पावसाने झोडपले… कोसारा पूल पाण्याखाली

सर्वात कमी किमतीत खरेदी करा सोलर झटका मशिन

स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.