चिमुकल्यांच्या नृत्यनाटीका व पथनाट्याने वेधले वणीकरांचे लक्ष

शाळा क्र. 8 मध्ये सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रम.... सावित्रीमाईंचे विचार दाखवणार स्त्रीमुक्तीची वाट - किरण देरकर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर पालिका शाळा क्रमांक 8 मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात करण्यात आली. या निमित्त प्रभातफेरी, पथनाट्य तसेच विद्यार्थी व पालकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण देरकर या होत्या. तर स्वाती खरबडे, सेवानिवृत्त शिक्षइका चित्रा बावणे, ज्योती धुर्वे, शंतनू चिल्लार, सुबोध भगत यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी शाळेत शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सकाळी 9 वाजता शाळेतून प्रभात फेरी निघाली. रंगारी पुरा, शिवनेरी चौक, शिवाजी महाराज उद्यान असे मार्गक्रमण करत सावित्रीबाई फुले चौकात या प्रभातफेरी पोहोचली. इथे मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

चिमुकल्यांच्या नृत्य नाटीकेने वेधले लक्ष
यावेळी चौकात शाळेतील 30 चिमुकल्यांनी पथनाट्य व नृत्य नाटीक सादर केली. या नाटकात त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा प्रवास व विचार याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाने उपस्थितांचे चांगलेच लक्ष वेधले. सदर नाटीकेचे संयोजन व दिग्दर्शन मुख्याध्यापक किशोर चौधरी यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका सुनिता जकाते, किरण जगताप, निलीमा राऊत यांनी केले.

नृत्यनाटीका सादर करताना विद्यार्थी

सावित्रीमाईंचे विचार दाखवणार स्त्रीमुक्तीची वाट – किरण देरकर
सामाजिक कार्यकर्त्या किरण देरकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सावित्रीबाई फुले यांच्या खडतर जीवनावर प्रकाश टाकला. सावित्रीमाईंचे विचार अंगिकारणे म्हणजे स्त्रीमुक्तीकडे वाटचाल करणे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी चिमुकल्यांच्या उपक्रमाचेही कौतुक केले. याशिवाय वणी ते सावित्रीबाई फुले यांनी काढलेली पहिली शाळा अशी महिलांच्या काढलेल्या पदयात्रेच्या आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला.

प्रभातफेरी शाळेत परत आल्यानंतर शाळेत पालक व चिमुकल्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र खरबडे, अविनाश तुंबडे, निशा कावडे, सचिन गुरनुले यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

हे देखील वाचा: 

वणीतील ‘त्या’ गोळीबाराला झाले 49 वर्ष पूर्ण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.