गोरक्षण समोर दोन गटात रात्री राडा, 16 जणांविरोधात गुन्हा दाखल

गोरक्षणावरून दोन गट एकमेकांविरोधात आक्रमक, दागिने व रोख रक्कम पळवल्याचा आरोप

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील गंगाविहार गोरक्षण (गोशाळा) समोर दोन गटात तुफान राडा झाला. यात दोन्ही गटाच्या 16 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एक गट हा बजरंग दलाचा तर दुसरा गट हा श्रीराम गोरक्षण संस्थेचा आहे. रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या राड्यात मारहाण केल्याचा, रोख रक्कम पळवल्याचा व सोन्याचे दागिने हिसकवल्याचा आरोप दोन्ही गटातर्फे केला आहे. या प्रकरणी दोन्ही गटाने परस्पर विरोधात तक्रार दिली आहे. 

Podar School 2025

पहिल्या तक्रारी नुसार, फिर्यादी नरेश हेमंतराव निकम (40) हा वसंत गंगाविहार वणी येथील रहिवासी आहे. तो ठेकेदारीचे काम करतो व त्याची रासा येथे श्रीराम गोरक्षण ट्रस्त नावाने गोशाळा आहे. गुरुवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी बस स्टँज जवळ एक वासरू नरेशला मृत अवस्थेत आढळले. संध्याकाळच्या सुमारास तो त्याच्या काही मित्रांना सोबत घेऊन उज्ज्वल गोरक्षण येथे वासरावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रात्री 10 वाजताच्या सुमारास तो गोशाळेच्या बाहेर आला असता तिथे अभि नागपुरे रा. वाल्मिकी नगर वणी हा आला. अभि याने फोन करून संतोष लकशेट्टीवार, विशाल दुधबळे या बजरंग दलाच्या पदाधिका-यासह आणखी 10 ते 12 कार्यकर्त्यांना बोलावले. तिथे विशाल आणि संतोष याने नरेशला रासा येथील गोशाळेचा हिशेब दे. तुझ्या सर्व काळ्या कारनाम्याचे व्हिडीओ आमच्या जवळ असून पैसे न दिल्यास हे कारनामे बाहेर काढू, अशी धमकी दिली. पुढे वाद वाढून आरोपी फिर्यादी नरेशच्या अंगावर धावून आले व त्यांनी नरेशला मारहाण केली. या मारहाणीत आरोपींनी सोन्याची चेन व 10 ते 12 हजार हिसकावून घेतले, असा आरोप नरेशने केला आहे.

दुस-या तक्रारी नुसार, संतोष तुळशीदास लक्षटीवार (28) हा इंदिरा चौक वणी येथील रहिवासी असून त्याचा ऑटो डिलिंगचा व्यवसाय आहे. तो बजरंग दलाचा नगर संयोजक आहे. तसेच तो अभि नागपुरे याचा सुरक्षा प्रमुख म्हणून काम पाहतो. रात्री अभि नागपुरे हा उज्ज्वल गोरक्षण येथे वासराच्या अंत्यसंस्काराला गेला होता. दरम्यान तिथे असलेल्या नरेश निकम, पवन उरकुडे, पवन बु-हाण यांच्यासह श्रीराम आरतीचे 10 कार्यकर्ते उपस्थित होते. तिथे त्यांनी अभि याला शिविगाळ केली. तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांबाबत अपशब्द वापरले.

यावर अभि याने संतोषला कॉल करून काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ये असा निरोप दिला. त्यामुळे फिर्यादी संतोष हा विशाल दुधबळे व आणखी काही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोशाळेत गेला. तिथे आरोपी नरेश निकम व त्याच्या साथीदारांनी संतोषला शिविगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत एकाने त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणी एका गटातील संतोष लक्षटीवार, विशाल दुधबळे, अभि नागपुरे यांच्यासह 5 अनोळखी तर दुस-या गटातील नरेश निकम, पवन उरकुडे, पवन बु-हाण यांच्यासह 5 अनोळखी अशा एकूण 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरोधात भादंविच्या कलम 143, 147, 149, 323, 327, 504, 506 कलमान्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दत्ता पेंडकर करीत आहे. 

हे देखील वाचा: 

Comments are closed.