ऑनलाईन मिळते 35 किलो धान्य, दुकानदार देतो 15 किलो
सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात लाभार्थ्याची तक्रार
विवेक तोटेवार, वणी: सरकारी स्वस्त दुकानात दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदय योजनेनुसार गरिबांना मोफत तसेच 2 रुपये किलोने धान्य दिले जाते. पण धान्य पुरवठा करणारा दुकानदार गेल्या वर्षभरापासून महिन्याला 35 किलो ऐवजी 15 किलो धान्य देत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. केशव मेश्राम असे तक्रारदारांचे नाव असून ते पिवळे रेशनकार्ड धारक आहे. मंगळावारी दिनांक 30 जानेवारी रोजी त्यांनी तहसीलदार यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.
केशव मेश्राम (69) हे सर्वोदय चौक येथील रहिवासी आहे. रुखमाबाई केशव मेश्राम (67) या त्यांच्या पत्नी आहे. कुटुंबप्रमुख म्हणून त्या अंत्योदय योजनेनुसार महिन्याला 35 किलो धान्याच्या लाभार्थी आहे. त्यांच्या नावे ऑनलाईन पद्धतीने 35 किलो धान्य दिल्याचा अंगठा घेऊन दुकानदार मात्र त्यांना प्रत्यक्षात मात्र 15 किलो धान्य देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हा प्रकार गेल्या एक वर्षापासून सुरु आहे. याआधी त्यांनी पुरवठा विभागाकडे याची तोंडी तक्रार केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी अखेर तहसिलदारांना लेखी तक्रार देत दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रार येताच तहसीदार यांनी सदर तक्रार अन्न पुरवठा विभागाकडे पाठविली आहे. या तक्रारींवर आता काय कार्यवाही होते हे पाहणे औचित्याचे ठरेल.
गरीबी रेषेखालील केशरी राशन कार्ड व दारिद्र रेषेखालील पिवळे रेशन कार्ड धारकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार सरकारी स्वस्त धान्य दुकानात मोफत किंवा अल्पशा दरात धान्य दिले जाते. धान्य पुरवठ्याची जबाबदारी सरकारी स्वस्त धान्य दुकानदारावर सोपविण्यात आली आहे. या धान्य वाटपात भ्रष्टाचार होऊ नये म्हणून सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. यात कुटुंब प्रमुखाला ऑनलाईन पद्धतीने अंगठ्याचा ठसा देऊन त्याच्या नावावर असलेले धान्य घेता येते. मात्र दुकानदार अनेकदा 35 किलोवर लाभार्थ्यांचा अंगठा घेऊन त्यांना प्रत्यक्षात कमी धान्य देत असल्याचे प्रकार अनेकदा उघड झाले आहे.
Comments are closed.