विवेक तोटेवार, वणी: शहरातील नांदेपेरा रोडवर असलेल्या सहारा पार्क येथे चोरट्यांनी धाडसी चोरी केली. गुरुवारी 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.40 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घरफोडीत सोन्याचे दागिने व नगदी असा एकूण पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीआय अनिल बेहरानी यांनी पदभार स्वीकारून अवघा एकही आठवडा झाला नसताना चोरट्यांनी त्यांना दिलेली ही सलामीच आहे.
शंकर किसन घुग्गुल हे सहारा पार्क वणी येथे आपल्या कुटुंबासह राहतात. ते एका खासगी शाळेत शिक्षक आहेत. तर त्यांची पत्नी ही रुग्णालयात नर्स म्हणून सेवा देते. 8 फेब्रुवारी रोजी शंकर हे सकाळी 7.35 ला शाळेत निघून गेले. तर त्यांची पत्नी ही सकाळी 10.15 वाजता घराला कुलूप लावून आपल्या जॉबवर निघून गेली.
दुपारी शंकर यांच्या पत्नीला शेजा-यानी घरफोडी झाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच त्यांची याची माहिती त्यांच्या पतीला दिली. माहितीवरून ते तात्काळ घरी निघून गेले. तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दराचे कुलूप कुंडीसह फोडलेले आढळले. त्यांनी घरात जाऊन बघितके असता अलमारीचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यामधून 4 तोळ्याची पोत (किंमत 1.60 लाख), कर्णफुले (8 हजार) व नगदी 5 हजार रुपये असा एकूण 1 लाख 73 हजाराचा मुद्देमाल चोरी गेल्याचे लक्षात आले.
चोरट्यांची नवीन ठाणेदारांना सलामी
वणीकर सध्या सर्वात जास्त चोरट्यांमुळे त्रस्त झाले आहेत. आधी रात्री होणा-या चो-या आता भरदिवसा देखील सुरु झाल्या. विशेष म्हणजे एकाही चोरीच्या गुन्ह्याचा छडा अद्याप लागला नाही. चोरट्यांच्या सातत्याने सुरू असलेल्या हैदोसामुळे वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राम महल्ले यांना वणीतून बदलून जावे लागले होते हे विशेष. पीआय अनिल बेहराणी यांनी ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारून अवघा एक आठवडा देखील झाला नाही. त्यांच्याकडून वणीकर मोठ्या अपेक्षा व्यक्त करीत आहे. भर दिवसा चोरी म्हणजे ही चोरट्यांनी नवीन ठाणेदारांना दिलेली सलामीच आहे.
शंकर यांनी त्वरित पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 380, 454 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
व्हॅलेन्टाईन विकमध्ये आनंद घ्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’चा
Comments are closed.