बहुगुणी डेस्क, वणी: स्वराज्य आणि सुराज्य हेच छत्रपती शिवरायांचे ध्येय होते. आयुष्याच्या अवघ्या 50 वर्षांच्या कारकीर्दीत रयतेच्या मनामनात धर्माभिमान आणि देशाभिमान जागृत करून मुगलांचे साम्राज्य धुळीस मिळविणारे शिवराय जगाच्या इतिहासात एकमेवाद्वितीय ठरलेत. वर्तमान स्थितीत उत्सवप्रियतेपेक्षा शिवरायांच्या देशाभमानाची प्रेरणा अंगीकारणे महत्त्वाचे ठरेल. असे विचार लोककलावंत डॉ. दिलीप अलोणे यांनी व्यक्त केलेत.
शिवजन्मोत्सव उत्सवाच्या निमित्ताने सावंगी जुनी येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. अलोणे प्रमुख वक्ते म्हणून विचार व्यक्त करीत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात उपसरपंच नानाजी आत्राम, माजी सरपंच धनराज राजगडकर, नानाजी ढवस, पोलीस पाटील अप्सरा पिदुरकर, ग्रामपंचायत सदस्य अर्चना जुनगरी, प्रीती पिदूरकर, रामचंद्र ठाकरे, मुरलीधर बेरड, श्रीराम आसुटकार, सुभाष काकडे, भूपेंद्र बोबडे व्यासपीठावर उपस्थित होते.
बळीराजा पूजनानंतर वृक्षारोपण करून शिवछत्रपतींच्या प्रतिमेला हारार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. विद्यार्थी कलावंतांनी मनमोहक नृत्य सादर केलीत. अतिथी डॉ. दिलीप अलोणे यांचा शाल श्रीफळ व शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. ज्या जिजाऊ मातेच्या मांडीवर शिवरायांच्या बालमनावर स्वराज्याच्या संस्काराचे बिजारोपण झाले, ती आई विविध सांस्कृतिक आक्रमणाच्या विळख्यात अडकून बसते की काय अशी भीती व्यक्त करीत डॉ. अलोणे यांनी छत्रपतींच्या शौर्य आणि पराक्रमाची मांडणी करीत उपस्थितांना रोमांचित केले.
सर्व भेदाभेद विसरून ग्राम विकासासाठी एकोप्याने आणि एकजुटीने गावकरी एकत्र आले पाहिजे. असे आवाहन अध्यक्ष विजय पिदुरकर यांनी व्यक्त केले. उपसरपंच नानाजी आत्राम यांनी आभार व्यक्त केले. तर दिनू हनुमंते यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
Comments are closed.