सूर्यफुलांच्या एका शॉटसाठी, दिग्दर्शकानं केली चक्क 4 महिने शेती ….
मराठी सिनेमातले अनेक भन्नाट प्रयोग घेऊन आला शशिकांत धोत्रे यांचा ‘सजना’ चित्रपट
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: मुव्हीच्या एका शॉटसाठी फुललेल्या सूर्यफुलांचं शेत हवं होतं. तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं अगदी काही क्षणांतच ते उभंही करता आलं असतं. मात्र दिग्दर्शकाला खऱ्या सूर्यफुलांचाच बहर हवा होता. एका तलावाच्या बाजूला ती खडकाळ जमीन होती. त्या जमिनीत हजारो खड्डे खोदून आधी माती भरली. त्यात सूर्यफुलांचं बीजारोपण केलं. काही महिने सूर्यफूलं येण्याची वाट पाहिली. ती फुलं फुललीत. मग केवळ काही मिनिटांचं शूट झालं. एवढ्या छोट्याशा शॉटसाठी खडकाळ जागी निगा राखून फुलं उगवणं गंमत नव्हती. तरीही त्या कलावंतानं हे सगळं उभं केलं. शॉट ओके झाला. नितांत सुंदर झाला. एवढ्या साध्या प्रसंगासाठी एवढी खटाटोप करणारा आर्टिस्टही भन्नाट आहे. त्याचं नाव शशिकांत, धोत्रे.
27 जुनला रिलीज होणाऱ्या ‘सजना’ या चित्रपटातील त्या मोजक्या काही फ्रेम्स होत्या. त्यासाठी तब्बल चार महिने फुलं उगवण्याची संपूर्ण टीम वाट पाहत होती. त्यामागील गुपीतही खास आहे. कारण साजन चित्रपटाचे निर्माता, लेखक व दिग्दर्शक शशिकांत धोत्रे हे स्वतः आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दर्जेदार चित्रकार आहेत. त्यांनी तयार केलेला ‘सजना’ हा चित्रपट म्हणजे चित्रात फुंकलेले रंगीत प्राण आहेत. हा चित्रपट म्हणजे भावनांची गुंफण करत पुढे जाणारी जणू चित्रमालिकाच आहे. कॅनव्हॉसवर उतरवायची कलाकृती जणू काही त्यांनी ७० एमएमच्या पडद्यावर उतरवली. त्यातील प्रत्येक फ्रेमवर अगदी बारकाईनं काम केलं. इतर चित्रपटांपेक्षा ही एकदम वेगळी लव्ह स्टोरी आहे. स्वतः चित्रकार असल्यामुळे दिग्दर्शकांनं प्रत्येक चौकटीत विविध रंगांची शिस्तबद्ध उधळण केली आहे. यात सामाजिक भान आहे. माणुसकीची जाण आहे. प्रणयाचा अलवार सुगंध ‘सजना’ला आहे.
सोबतच विदारक भीषणताही यात उघडी पाडली आहे. एका भटक्या जातीचं रोजचं जगणं व संघर्ष यात दिसतो. चित्रपटाचं शीर्षक ‘‘सजना’’ ही मुळात त्यातील पात्रं आहेत. अशा तीन सजनांची नेत्रदीपक व नादमाधुऱ्यानं भरलेली ही एक रम्य कथा आहे. यात ॲक्शन, रोमान्स, कॉमेडी असं सगळंच आहे. यातील कोणताच अंग कुणावरच हावी होण्याचा प्रयत्न करत नाही. एकमेकांचा हात धरून चित्रपटाची रंगत क्षणाक्षणाला वाढवत जातात. शोमॅन राज कपूर यांचे चित्रपट आपल्याला आठवतात. भरपूर गाणी आणि नादमधुर संगीत ही त्यांच्या चित्रपटांची जान होती. ‘सजना’ पाहताना, ऐकताना, अनुभवताना याची आपल्याला वारंवार प्रचिती येते. यातील गाणी हा चित्रपटातील एक अत्यंत महत्त्वाचा धागा आहे. एकेक प्रसंगाला लिंक करत नेणारी ही गाती कथाच आहे. तारुण्याला आकर्षित करणारी ही कथा आहे.
तरीदेखील ‘सजना’ आबालवृद्धांना हवाहवासा वाटणारा ठरेल. आपण आपल्या आयुष्यातलं यशस्वी असो की अयशस्वी असो पहिलं प्रेम सहसा कुणीच विसरत नाही. अल्लड वयातल्या प्रेमाचा स्वतःचाच फ्लॅशबॅक आपण ‘सजना’त अनुभवू शकतो. ‘सजना’ पाहणाऱ्या कोणत्याही वयाच्या रसिकाला ती त्याची कथा वाटते. त्यातील एखाद्या पात्रात तो स्वतःला शोधतो. म्हणून हा चित्रपट कुणा तिसऱ्या-चौथ्या व्यक्तीवर नसून माझ्यावरच तयार झाला, अशी आपल्याला अनुभूती येते. दोन काळजांना जोडणारा ‘सजना’ हा एक अस्सल रंगीत रस्ता ठरतो. दिग्दर्शक शशिकांत धोत्रे यांच्या हातांत पेन्सीलची कमालीची जादू होती. मात्र हातांना रंग लागले नव्हते. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरपूर या गावात त्यांचा जन्म झाला. निसर्गाच्या सानिध्यातच ते लहानांचे मोठे झाले. पृथ्वीच्या कॅनवासवर निसर्गाची चित्रमाला ते बघत होते. धोत्रे यांच्या रंगांची प्रेरणाच मुळात निसर्गात आहे. त्याचा अनुभव घेत होते. चित्रपट तयार करण्याचं स्वप्न अनेक वर्षांपूर्वीच डोळ्यात ठाण मांडून बसलं होतं. ते पूर्ण झालं.
अनेक वेगळ्या रंगांची उधळण या चित्रपटात दिसते. चित्रपट आरशासारखाच अस्सल आणि स्पष्ट प्रतिबिंब दाखवणारा असावा ही त्यांची इच्छा आणि निर्धारही होतात. त्यामुळे त्यांनी फ्रेमसाठी प्रचंड मेहनत घेतली. अनेक झोपड्या असलेली वस्ती त्यांना चित्रपटात दाखवायची होती. ती वस्ती उभारण्यासाठी त्यांनी त्याच अस्सल लोकांनाच बोलावलं. त्यांच्याजवळ असलेल्या साधनांनीच ही रंगबिरंगी वस्ती उभारली. गरीब व सामान्य लोक ज्या रंगांचे कपडे घालतात त्याच रंगांचा त्यांनी चपखल उपयोग केला. रंगांच्या व्याकरणापलीकडचं अद्भुत चित्रण ‘सजना’त आपल्याला पाहायला मिळेल. एका अस्सल प्रतिभावंत चित्रकाराच्या डोळ्यांनी जगण्याचे नवे रंग ‘सजना’त पाहायला मिळतात.
‘सजना’ चित्रपटाचे दिग्दर्शक शशिकांत धोत्रे स्वतःबद्दल फारसं बोलत नाही. मात्र त्यांच्या अनेक दोस्तांकडे त्यांच्या आठवणींचा खजिनाचा आहे. अमरावतीचे काही दोस्त आणि शशिकांत मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी. सगळेच चित्रांत रंगणारे, म्हणून घप्प दोस्ताना झाला. त्यांनी मिळून शक्य तितक्या आर्ट गॅलरींना भेटी दिल्यात. यांच्या होस्टेलवर पहिल्यांदाच त्यांनी ब्लॅक कॅन्वासवर रंगांची पेरणी केली. तिथून त्यांचा रंगीत प्रवास सुरू झाला. शशिकांत यांचं एक वेगळं समीकरण होतं. मुव्हीचं स्वप्न उराशी होतंच. लंडनलाही स्वत:च्या चित्रांचं प्रदर्शन लावण्याची इच्छा होती. त्यांची चित्रं आज अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, बराक ओबामा यांच्यासह जगभरातील अनेक दालनांत मोठ्या दिमाखात मिरवत आहेत.
शशिकांत धोत्रे लहानशा गावातून मुंबईला आलेले. ही मायानगरी त्यांच्यासाठी अगदी नवखी. आजही त्यांची गावाशी असलेली नाव जुळलेलीच आहे त्यांच्या चित्रांमधून गावाच्या मातीचा सुगंध येतो. जात्यावर दळणाऱ्या बाया, हाताला मेंदी लावणाऱ्या मुली, खिडकीत वाट पाहणारी तरुणी अशा हजारो चित्रकृती इथल्या संस्कृतीचं रम्य दर्शन आहेत. चित्रांसोबतच चित्रपटही त्यांच्या डोक्यात दरवळत होता. तसा मानस त्यांनी आपल्या दोस्तांजवळ बोलूनही दाखवला. त्यांच्या नजरेसमोर चित्रपटाच्या सर्व फ्रेम्स तयार होत्या. मात्र चित्रपट तयार करण्याचं प्रत्यक्ष ज्ञान काहीच नाही. पण एकदा ठरलं म्हणजे ठरलं. त्यांच्या चित्रपट निर्मितीच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांचे सर्व दोस्त सोबत आलेत.
वेगवेगळ्या क्षेत्रांतील ते जबर कलावंत आहेत. स्टारकास्ट करताना म्हणजेच पात्र निवडतानाही त्यांनी आपलं कौशल्य पणाला लावलं. या सुंदर कलाकृतीचा प्रवास ओमकार स्वरूप यांनी संगीत देऊन सुरेल केला. सुहास मुंडे यांनी त्यात गीतांची पेरणी केली. सिनेरसिकांना काहीतरी फ्रेश देता यावं म्हणून अभिनेत्यांसह जवळपास सर्वच कलावंत फ्रेश घेतलेत. तब्बल चार वर्षं चित्रपटाचं शूटिंग चाललं. झोपडी, घर अशा अनेक वस्तू ह्या मातीतल्या कलावंतांनीच तयार केलेल्या आहेत. त्यांच्या आई स्वतः उत्तम कपडे शिवतात. या चित्रपटातील सर्व कलावंतांचे कपडे त्यांच्या आईनींच डिझाईन केलेत. नेहमीच्या पठडीवेगळे कॅमेराचे अँगल्स ही ‘सजना’ची ताकद आहे.
‘सजना’ चित्रपटाची कथा आणि पटकथा प्रत्येक वाक्यावर पाहणाऱ्याला कनेक्ट करते. संवाद शब्दबंबाळ नाहीत. ते तुमच्या आमच्या जगण्यातल्या भावनांची उत्स्फूर्त अभिव्यक्ती आहे. मुव्ही जितकी मनोरंजक आहे, तितकीच त्याच्या निर्मितीची कथाही रंजक आहे. जेवताना, चहा पिताना सर्वत्र चर्चा व्हायची ती फक्त ‘सजना’ची. हा चित्रपट एका चित्रकरानं तयार केला. तरीदेखील नाट्य, शिल्प, अभिनय, चित्र, नृत्य, गायन अशा जवळपास सर्वच कलांचा संगम ‘सजना’तून अनुभवता येतो. कोणत्याही क्षेत्रातील कलावंत अथवा रसिकांनी पाहिलाच पाहिजे असा हा ‘सजना’ आहे.
शशिकांत धोत्रे सामान्य परिवारातून आलेले हाडाचे कलावंत आहे. निसर्ग त्यांचा पहिला गुरु आहे म्हणूनच ते कधीच कुठल्याच चाकोरीत किंवा चौकटीत अडकले नाहीत. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग रसिकांना हात धरून सोबत घेऊन चालतो. चित्रपट पाहताना रसिक त्यातील पात्रांसोबतच आतून वावरत असतात. शशिकांत धोत्रे यांनी ‘सजना’ नावाचा 70mm चा आरसाच रसिकांपुढं ठेवला. कुठल्याच प्रसंगात, संवादात, दृश्यात ओढाताण नाही. जे पाहिलं, अनुभवलं तेच डोळ्यांसमोर पुन्हा अनुभवता येतं. सामान्य माणूस आपल्या कलेतून एवढी असामान्य कलाकृती निर्माण करू शकतो याचं नितांत सुंदर उदाहरण म्हणजे ‘सजना’.
शशिकांत धोत्रे सिनेमाला व्हिज्युअल आर्ट मानतात. ती एक दृश्यकला आहे, यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आतापर्यंत कधीच न आलेली अनेक दृश्यं, फ्रेम्स आपल्याला ‘सजना’त पाहायला मिळतात. ज्यांच्यामुळे भारतीय सिनेसृष्टी उभी झाली ते दादासाहेब फाळके स्वतः उत्तम चित्रकार होते. बाबुराव पेंटर, वा. सी. बेंद्रे आदी काही महान दिग्दर्शक हे मुळात चित्रकारच होते. धोत्रे यांचा ‘सजना’ हा आता त्यांच्यापुरता मर्यादित राहिलाच नाही.
‘सजना’ हा चालत्या बोलत्या चित्रांचा रंगीत गुलदस्ताच आहे. ही तुमची आमचीच कहाणी आहे. येत्या 27 जूनला जवळच्या सिनेमागृहात स्वतःच शोधायला सहपरिवार नक्की या. या सर्व पत्रांमध्ये तुमची स्वतःशीच नक्की भेट होईल असा विश्वास देतो. शशिकांत धोत्रे यांच्या ‘सजना’ या कलाकृतीचं या मराठी मातीतील सर्व रसिकांनी दिलखुलास स्वागत करावं अशी अपेक्षा करतो.
Comments are closed.