बहुगुणी डेस्क, वणी: तारुण्य म्हणजे उमेदीचा काळ. खूप काही करून दाखवण्याची ऊर्जा आणि क्षमता या वयात असते. मात्र थोडेसेही नैराश्य जीवनाचा अंत करते. हीच बाब राजूर (कॉलरी) येथील प्रिया बन्सी प्रजापती (18) या युवतीच्या बाबतीत झाली. तिने गुरुवार दिनांक 26 जून रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आपल्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली.
प्रिया राजूर (कॉ.) येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये राहत होती. तिने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. ती पुढील शिक्षण घेण्याच्या तयारीतच होती. मात्र नैराश्येतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल तिने उचलले. तिचा जीवनप्रवास खूप संघर्षमय आणि खडतर होता. वडील गेल्यावर आईनेच प्रियासह तिच्या बहिणींचाही सांभाळ केला. प्रियाच्या दोन बहिणींपैकी मोठ्या बहिणीचे लग्न झाले. गुरुवारी 26 जुनला दुपारी घरी कुणीच नव्हते. तेव्हा तिने घरातील खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्य घरी परतल्यानंतर त्यांना प्रिया गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. प्रियाच्या आत्त्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस कारणांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहे.


Comments are closed.