भाजपची नवीन शहर कार्यकारिणी जाहीर

स्थानिक विकासाला दिशा मिळेल – ऍड नीलेश चौधरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतीय जनता पार्टी (भाजप) वणी शहर मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा सोमवारी दिनांक 21 जुलै रोजी एस.बी. हॉल, वणी येथे करण्यात आली. भाजपचे शहर अध्यक्ष ऍड नीलेश माया महादेव चौधरी यांच्या नेतृत्वात 96 जणांची ही कार्यकारिणी गठित करण्यात आली. यासह शक्ती केंद्र, बुथ प्रमुख यांच्या नियुक्तीसह निमंत्रित वरिष्ठ नेत्यांचाही कार्यकारिणीत समावेश आहे. नवीन कार्यकारिणीमुळे स्थानिक पातळीवरील विकासाला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया ऍड. नीलेश चौधरी यांनी दिली.

जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या मान्यतेने माजी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष व माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य दिनकरराव पावडे, माजी वणी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, माजी शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, ज्येष्ठ नेते महादेव खाडे, व्यापारी आघाडी अध्यक्ष लवलेश लाल, संध्या अवताडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी वणी शहरातील काही गणमान्य व्यक्तींचा पक्षप्रवेशही झाला.

कार्यकारिणीत 3 सरचिटणीस, 9 उपाध्यक्ष, 9 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष, 1 सह-कोषाध्यक्ष, 9 विविध मोर्चा/आघाडी अध्यक्ष, 11 विविध सेल अध्यक्ष, 53 कार्यकारिणी सदस्य अशा एकूण 96 जणांची नियुक्ती करण्यात आली. तसेच, 16 शक्ती केंद्र प्रमुख, 49 बूथ प्रमुख आणि 13 कायम निमंत्रित वरिष्ठ नेत्यांचीही घोषणा करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्थानिक विकासाला दिशा मिळेल – ऍड नीलेश चौधरी
भाजपच्या विचारधारेप्रती निष्ठा आणि वणी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहून नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू. सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे कार्य अधिक बळकट करू. नव्या कार्यकारिणीच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्याला व स्थानिक पातळीवरील विकासाला नवी दिशा मिळेल.

कार्यक्रमात संजीवरेड्डी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डे आणि श्रीकांत पोटदुखे यांनी मनोगत व्यक्त करत नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. त्यांनी पक्षाच्या कार्याला गती देण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिंपळशेंडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजू गव्हाणे यांनी मानले. या कार्यक्रमाला वणी शहरातील गणमान्य व्यक्ती आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.