मंगलम पार्क येथे घरफोडी, पावने तीन लाखांचा ऐवज लंपास

रोख रकमेसह दागिन्यावर डल्ला, घरफोडीचे सत्र सुरूच

 बहुगुणी डेस्क, वणी: शहरालगत असलेल्या मंगलम पार्क, चिखलगाव येथे चोरट्यांनी घरफोडी केली. या घरफोडीत चोरट्यांनी रोख रकमेसह 2.66 लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. सोमवारी दिनांक  21 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वणीतील घरफोडीचे सत्र काही केल्या थांबत नसल्याने वणीकरांची दहशत अद्याप कमी झालेली नाही.   

तक्रारीनुसार, नीलेश ओमप्रकाश चचडा (46) हे मंगलम पार्क, चिखलगाव येथे कुटुंबीयांसह राहत असून ते ते मारेगाव फार्मसी कॉलेज येथे प्राचार्य आहे. ते 18 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7:00 वाजता घराला कुलूप लावून त्यांच्या भावाला भेटण्यासाठी नागपूरला गेले होते. 21 जुलै रोजी दुपारी ते घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. त्यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना बेडरूमच्या लोखंडी कपाटाचे कुलूप तुटलेले आढळले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांनी लॉकर चेक केले असता त्यांना त्यातून 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट (किंमत 19,000 रुपये) आणि 20,000 रुपये रोख चोरीला गेल्याचे दिसून आले. तसेच, लाकडी कपाटातून 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (1,11,000 रुपये), दोन जोडी सोन्याच्या रिंग्ज (3 ग्रॅम-28,000 रुपये आणि 4 ग्रॅम-37,000 रुपये), 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (46,000 रुपये), 15 ग्रॅम वजनाची चांदीची पायपट्टी (1,700 रुपये) आणि 30 ग्रॅम वजनाची दोन चांदीची मेडल्स (3,300 रुपये) असे एकूण 2,66,000 रुपये किमतीचे दागिने आणि 20 हजार रोख रक्कम चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.

त्यांनी तातडीने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 305(a), 331(1), 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वणी पोलिसांकडून सुरू आहे.

Comments are closed.