लहान मुलांचा शुल्लक वाद पोहोचला हाणामारीपर्यंत

खरबड्यात एकाला फावड्याने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: शेजारी राहणा-या दोन लहान मुलांचा वाद पालकांपर्यंत गेला. पालक विचारणा करण्यासाठी गेले असता त्याला फावड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मंगळवारी दिनांक 22 जुलै रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास खरबडा परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी वणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, सय्यद ईरफान सय्यद ताज (वय 40, रा. रंगनाथनगर, खरबडा मोहल्ला)  यांच्या मुलाचा शेजारी राहणाऱ्या एका मुलाशी वाद झाला. त्यामुळे त्यांचा मुलगा रडत वडीलांजवळ गेला. त्यामुळे याबाबत विचारणा करण्यासाठी सय्यद ईरफान हे शेख जाबीर (वय 39) याच्या घरी गेले. सय्यद यांनी शेख जाबीरला तुमच्या मुलाला समज द्या असे म्हटले. दरम्यान शेख जाबीर याने लाकडी पावड्याच्या दांड्याने सय्यदला मारहाण केली. तसेच, कुटुंबातील इतर दोन महिलांनी देखील सय्यद यांना थापड, बुक्क्यांनी मारहाण केली.

सय्यद ईरफान यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी शेख जाबीर व आणखी दोघांविरोधात बीएनएसच्या कलम 3(5), 115(2), आणि 118(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. 

Comments are closed.