ऑफलाईन मटका झाला ऑनलाईन, पद्मावतीनगरीत पोलिसांची धाड

फ्लॅटमध्ये सुरू होता वरली मटका... 4 आरोपींना अटक

बहुगुणी डेस्क वणी: शहरातील पद्मावती नगरी येथील लक्ष्मी नारायण अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या ऑनलाईन वरली मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत चौघांना अटक करण्यात आली. यातील तिघे तेलंगणातील आहेत. कारवाईत पोलिसांनी 9 हजारांच्या रोकडसह 1 लाख 54 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी दिनांक 23 जुलै रोजी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. या धाडीमुळे आता ऑफलाईन मटका ऑनलाईन झाल्याचे समोर आले आहे.

ठाणेदार गोपाळ उंबरकर यांना खबरीद्वारे घुग्घुस रोडवरील पद्मावती नगरी येथे ऑनलाईन पद्धतीने वरली मटका सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार रात्री 11.30 वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने हे पथकाला घेऊन पद्मावती नगरीत गेले. तिथल्या लक्ष्मी नारायण अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटवर काही लोक टॅब, लॅपटॉपवरून कागदावर काही नोंदी करताना आढळले. मटका सुरु असल्याची खात्री होताच पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला.

या कारवाईत पोलिसांनी आरोपी गोपीनाथ सोमय्याजुलु बंडी (वय 60, रा. वारंगल, तेलंगणा), राजेंद्र यादगीरी येलगंटी (वय 52, रा. पेगडामपल्ली, तेलंगणा), फरदिन अतिक अहेमद (वय 24, रा. सबा कॉलनी, वणी) आणि स्वामी कोमराया बोक्का (वय 36, रा. म्युचाराला, तेलंगणा) यांना ताब्यात घेण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी घटनास्थळावरून दोन अँड्रॉइड मोबाईल (40 हजार रुपये), दोन जुने मोबाईल (40 हजार रुपये), दोन टॅब (20 हजार रुपये), एक प्रिंटर (20 हजार रुपये), दोन कॅल्क्युलेटर (500 रुपये), एक लॅपटॉप (25 हजार रुपये), वरली मटका आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या आणि 9 हजार 200 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला. 

अटक केलेले चौघे व फ्लॅट मालकासह 5 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने करत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उंबरकर यांच्या आदेशानुसार PSI धीरज गुल्हाने, PSI अंकुश वडतकर, पोकॉ मिथुन राऊत, पोकॉ मोनेश्वर खंडरे, पोकॉ गजानन कुडमेथे, पोकॉ नंदकुमार पुप्पुलवार यांनी केली.

साईलीला नगरी नवविवाहिता आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल

Comments are closed.