शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
मनसे शहर अध्यक्ष अंकुश बोढे यांचा नगरपालिकेला इशारा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात मोकाट जनावरांमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात मनसेच्या शिष्टमंडळाने उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांची भेट घेऊन या संदर्भात एक सविस्तर निवेदन सादर केले. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी मनसेने केली आहे. अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल अशा इशारा अंकुश बोढे यांनी दिला आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, टागोर चौक, खाती चौक, तुटी कमान, गांधी चौक यासह अन्य वर्दळीच्या चौकांमध्ये आणि रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यवतमाळ व वरोराकडे जाणाऱ्या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांवर ही जनावरे बिनधास्तपणे फिरत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. दुचाकीस्वार अचानक समोर आलेल्या जनावरांना वाचवताना मोठ्या प्रमाणात अपघातांना बळी पडत आहेत.
तसेच, ही जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. शहरातील रहिवाशांमध्ये विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे, कारण अनेकदा ही जनावरे एकमेकांशी भांडतात किंवा अचानक धावू लागतात. या निवेदनात मनसेने प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले. शहरातील रस्त्यांवरून जनावरांना हटवून नागरिकांसाठी सुरक्षित आणि मोकळे रस्ते उपलब्ध करून देणे ही नगर परिषदेची जबाबदारी असल्याचा मुद्दाही यावेळी ठळकपणे मांडण्यात आला.

जर या गंभीर समस्येवर नगर परिषदेने तातडीने व प्रभावी कारवाई केली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मनसे लोकशाही मार्गाने तीव्र आणि निर्णायक आंदोलन छेडेल, असा निर्वाणीचा इशाराही यावेळी देण्यात आला. या निवेदनाची एक प्रत वाहतूक शाखेला सुद्धा देण्यात आली. निवेदन देताना मनसेचे शंकर पिंपळकर, मयुर गेडाम, योगेश तडम, अमोल धानोरकर, नितीन धाबेकर, बबलू घरडे, हिरा गोहोकार, अक्षय बोबडे, अहमद रंगरेज, कृष्णा पोद्दार, जुबेर खान, सतीश ठोंबरे, राजेश खीरटकर, सूरज खोंडे, साहिल येरने, दत्ता धोटे, बाबू राजभर, कृष्णा कुकडेजा यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments are closed.