बहुगुणी डेस्क, वणी: मुकुटबन रोडवर गणेशपूर जवळ निर्गुडा नदीच्या पुलाजवळ एका कारचा अपघात झाला. सोमवारी रात्री साडे 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी हे मारेगाव येथील नगरसेवक असल्याची माहिती आहे. वणी-मुकुटबन रोडवरील एका रेस्टॉरन्टमध्ये जेवण करून मारेगाव येथे परतत असताना हा अपघात झाला.
प्राप्त माहितीनुसार, जितेंद्र नगराळे हे मारेगाव येथील रहिवासी असून ते वार्ड क्रमांक 17 चे नगरसेवक आहे. ते सोमवारी दिनांक 4 ऑगस्ट रोजी एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वणी येथे ईको स्पोर्ट (MH-27-BE-9800) या कारने आले होते. मुकुटबन रोडवरील एका रेस्टॉरन्टमध्ये रात्री जेवण केल्यानंतर ते मारेगाव येथे घरी परतत होते. दरम्यान गणेशपूर जवळील निर्गुडा नदीच्या पुलाजवळ त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. कार पलटी झाली व कार पुलाशेजारील खड्ड्यात कोसळली.
हा अपघात इतका गंभीर होता की त्यांची कार दोनदा पलटी झाली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व छातीला दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या परिचितांनी त्यांना वणीतील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आहे.


Comments are closed.