बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील वागदरा फाटा येथे बुधवारी दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी अनधिकृत फवारणी औषध विक्री करणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली. या कारवाईत सुमारे ₹5,14,190 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) दीपक चंद्रप्रकाश वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा (L.C.B.) सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
बुधवारी संध्याकाळी 7 वाजता पोलीस पथक, पंच आणि कृषी विभागाचे अधिकारी रविंद्र भोजने, देवेंद्र पाचभाई आणि विष्वास फुलमाळी यांच्या संयुक्त कारवाईत MH-29 R-3029 क्रमांकाची मारुती सुझुकी कार संशयास्पद स्थितीत आढळली. तपासात कारमधून 80 बॉक्स आणि 10 बाटल्या अनधिकृत फवारणी औषधांचे (किंमत ₹2,14,190) तसेच कारचाही समावेश असलेला एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात अटक करण्यात आलेले योगेश गुणवंतराव देशमुख (वय 44, रा. बेला, जि. आदिलाबाद, तेलंगणा) आणि सचिन शंकर उरकुडे (वय 40, रा. बेला, जि. आदिलाबाद, तेलंगणा) यांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित फवारणी औषधांची अनधिकृत विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 318(4) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Comments are closed.