बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सैदाबाद आणि कळमना या दोन गावांमध्ये स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) दोन शेतकऱ्यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याच्या दु:खद घटना घडल्या. यातील एक घटना ही सैदाबाद तर दुसरी घटना कळमना येथील आहे. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सैदाबाद येथील घटना
सैदाबाद येथील शेतकरी राजकुमार मारोती गोवारदिपे (वय 55) यांनी शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घरी कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजकुमार यांच्या नावे 1.38 हेक्टर शेती आहे. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
कळमना येथील घटना
दुसऱ्या घटनेत कळमना येथील शेतकरी सहदेव विश्वनाथ बोबडे (वय 53) यांनी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. त्यांना वणीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु रात्री त्यांचा मृत्यू झाला. सहदेव यांच्या नावे 1.29 हेक्टर शेतजमीन आहे आणि त्यांच्यावर चिखली परमडोह ग्रामविकास सोसायटीचे पीक कर्ज आहे. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी आणि दोन मुलगे आहेत.
दोन्ही आत्महत्यांचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या घटनांमुळे वणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि मानसिक समस्यांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.



Comments are closed.