बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलिसांनी शनिवारी, दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी ब्राम्हणी फाटा ते निळापूर मार्गावर छापा मारून अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश केला. एका पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा चारचाकी वाहनातून ही तस्करी सुरु होती. या प्रकरणी 82,980 रुपये किमतीचा अवैध विदेशी दारूसाठा आणि 6 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 6,82,980 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही व्यक्ती घुग्घुस येथील आहेत.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, ब्राम्हणी फाटा ते निळापुर रस्त्यावर एका इर्टिगा वाहनात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याचे समजले. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. दरम्यान संध्याकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास तिथे एक अर्टिगा वाहन (MH34BF2140) आले. पोलिसांच्या पथकाने तातडीने वाहनाची तपासणी केली. तपासणीत वाहनातून विविध विदेशी कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या आढळल्या, ज्यांची किंमत 82,980 रुपये आहे. पोलिसांनी दारूसाठा यासोबतच 6 लाख रुपये किमतीचे इर्टिगा वाहनही जप्त केले.

या प्रकरणी प्रवीण शंकरराव मुन (वय 50, रा. घुग्गुस, जि. चंद्रपूर) आणि विठ्ठल वासुदेव पोलशेट्टीवार (वय 60, रा. घुग्गुस, जि. चंद्रपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (अ) आणि 65 (ई) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर यांच्या आदेशानुसार पोउपनि धीरज गुल्हाने आणि डी.बी. पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.



Comments are closed.