बहुगुणी डेस्क, वणी: रात्री अचानक एका खुनाने वणी शहर थरारले. भरवस्तीत तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळताच शहरात खळबळ उडाली. मल्लेश नेरकुंटलावार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एका संशयीतास ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी रात्री यवतमाळ रोडवरील बाकडे पेट्रोल पंपासमोर ही खुनाची घटना उघडकीस आली. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास बाकडे पेट्रोल पंप लगत असलेल्या एका ऑटोमोबाईल दुकानाच्या व्हरांड्यात एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. ही बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. माहिती मिळताच वणी पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
मृताची ओळख मल्लेश नेरकुंटलावार (वय अंदाजे 24, रा. दामले फैल, वणी) अशी पटली आहे. सकृतदर्शनी तपासात त्याच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने जोरदार प्रहार केल्याचे आढळून आले आहे.
दारूच्या नशेतून वाद?
प्राथमिक माहितीनुसार, दारूच्या नशेतून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मल्लेशच्या भु-या नामक एका मित्राला संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याची माहिती समोर येत आहे. मित्रामध्ये झालेल्या भांडणातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. दोन दिवसांआधीच शिबला येथील अमानुष खुनाने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर लगेच खुनाची दुसरी घटना उघडकीस आली आहे.
व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशीच लिव्ह-इन पार्टनरने प्रियकरावर उगारला चाकू


Comments are closed.