श्रीराम मंदिर कथित देणगी अपहार प्रकरण; वणीत आंदोलन
आमदार संजय देरकर यांची दोषींवर कठोर कारवाईची मागणी
पुरुषोत्तम नवघरे, वणी: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित देणगी अपहार प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी वणी शहरात शनिवारी रामभक्तांनी रामरक्षा आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला. जागृती मारोती मंदिर, आंबेडकर चौक येथे प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली. यावेळी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या आंदोलनात आमदार संजय देरकर यांनी प्रभू श्रीरामांची महाआरती करून रामललाच्या चरणी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी प्रार्थना केली.
यावेळी बोलताना आमदार देरकर म्हणाले की, प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण झालेला निधी हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा, विश्वास आणि समर्पणाचे प्रतीक आहे. त्या निधीच्या कथित अपहाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच श्रीराम मंदिरासाठी भाविकांनी अर्पण केलेल्या चांदीच्या विटा आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या कथित अपहाराचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
हा लढा कोणत्याही राजकीय हेतूने नसून धर्मरक्षण, पारदर्शकता आणि जनविश्वास अबाधित ठेवण्यासाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रामनामाच्या जयघोषात आणि सामूहिक महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
या आंदोलनात सहजिल्हाप्रमुख संजय निखाडे, किरण देरकर, शहरप्रमुख विनोद ढुमणे, तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, नगरपरिषद गटनेते सुधीर थेरे, पंढरी राजुरकर, सचिन कुचनकर, मंगेश मोहितकर, सत्यवान महाकुलकर, दिवाकर उरकुंडे, टीमनताई टोंगे, कीर्तीताई देशकर, सविता आवारी, मोरेश्वर उज्वलकर, अनिकेत बदखल, राजू पाटील, प्रकाश कराड, सुरेशराव देशकर, डॉ. जगन जूनघरी, कुंदन टोंगे, महेश सोमलकर, किशोर मोहेवार यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेकडो रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.


Comments are closed.