बहुगुणी डेस्क: त्याचा विद्यार्थ्यांशी संवाद केवळ अॅकॅडमिक नव्हता. तर त्यात विद्यार्थ्यांसोबतचा जिव्हाळा होता. तो केवळ एक शिक्षक नव्हता, तर मुलांचा पालकच होता, त्यांचा मोठा भाऊ. प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याला माहित होती. विद्यार्थ्यांना हाताळताना ती पार्श्वभूमी त्याच्या डोळ्यासमोर असायची. शिकवणं असं की मुलं एकाग्र होऊन ऐकत राहत. इंग्रजी विषय शिकवता शिकवता एक भावनिक नातं त्याचं विद्यार्थ्यांसमवेत होऊन गेलं आणि बदलीनंतर त्याला शाळा सोडणं मुश्कील झालं. मुलांनी त्याला घेरलं. हातांचा विळखा घालून घट्ट धरून ठेवलं. मुलांनी विनवण्या केल्या, सर प्लीज नका जाऊ!!! मुलं रडत होती. ती कुणाचंच ऐकत नव्हती. शेवटी त्या शिक्षकाचाही बांध फुटला आणि तो ढसाढसा रडू लागला.
तामीळनाडूतील थिरूवेल्लूरमधील वेलियाग्राम गावातील सरकारी शाळेतील जी भगवान हा २८ वर्षीय शिक्षक आणि त्याच्या विद्यार्थ्यांमधील अनुबंधाची ही कथा. गोष्टीच्या पुस्तकातली नव्हे, तर वास्तवातली.
जी भगवान त्या शाळेत २०१४ ला आले. संवेदनशील मनाच्या भगवानने आपल्या कामात जीव ओतला. शिकवण्याची एक प्रभावी शैली त्याच्याकडे होतीच, सोबत प्रोजेक्टरचा परिणामकारक वापर करीत त्याने विद्यार्थ्यांत विषयाची जबरदस्त गोडी निर्माण केली. ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना तो शिकवत होता आणि प्रत्येक विद्यार्थ्याशी त्याचे ऋणानुबंध जुळून आले होते. पण शाळेची विद्यार्थी संख्या अवघी २८१. सर्वात कनिष्ठ म्हणून तो अतिरिक्त ठरला. तिरूत्तनी येथील अरूणगुलाममध्ये त्याची बदली झाली.
भगवानला कल्पना नव्हती की विद्यार्थ्यांकडून इतकी अनावर प्रतिक्रिया उमटेल. त्यानेही शिक्षक परिषदेत अरूणगुलामला पसंती प्राधान्य दिलं होतं. पण बदलीनंतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवाराच्या बाहेरही त्याला पडू दिलं नाही. इतकंच नव्हे, तर पालकांनीही भगवानच्या बदलीविरोधात निदर्शनं केली. अखेर भगवाननेच मी अजून दहा दिवस आहे इथे, म्हणत त्यांची समजूत काढली.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पीटीटीव्हीने तिला प्रसारित केलं आणि त्याची दखल घेऊन शिक्षण विभागाने बदली तात्पुरती स्थगित केलीय. तूर्त भगवानच्या बदलीसंदर्भात काय निर्णय घ्यायचा यावर विचारविनिमय सुरू आहे.
स्त्रोत : द न्यूज मिनट
मुक्त शब्दांकन : राज असरोंडकर