मातृप्रेमाच्या ‘‘सागर’’ने आईलाच केले सेलिब्रेटी
आईच्या हस्तेच केला नव्या व्यवसायाचा शुभारंभ
विवेक तोटेवार, वणीः आई जगातली सगळ्यात मोठी सेलिब्रेटी असते लेकरांसाठी. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जवळपास सगळ्याच लेकरांचा प्रयत्न असतो. आई म्हणजे प्रेमाचा सागर असतो. आपल्या आईच्या प्रेमापोटी व मातृप्रेमाचा गौरव करीत एका युवकाने जे पाऊल उचलले ते सर्वत्र कौतुकास्पद झाले आहे. आपल्या नवीन व्यवसायाचे उद्घाटन त्याने आपल्या आईच्या हाताने करून समाजापुढे मातृप्रेमाचा आदर्श ठेवला. इंदिरा आणि ज्योतिबा पोटे यांचे चिरंजीव सागर याने आपल्या आईच्या हस्ते त्याच्या ‘‘सागर फोटो स्टुडिओ’’ या वणीतील नांदेपेरा रोडवरील सेवन स्टार मॉलजवळील नवीन प्रतिष्ठानाचे उद्घाटन केले. स्वराज्याची प्रेरणा राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले.
कोणत्याची नव्या कामाचे उद्घाटन करायचे म्हटल्यास मोठ्या राजकीय नेत्याला किंवा सेलिब्रेटीला बोलावणे ही नित्याचीच बाब झाली आहे. पण आपली जन्मदात्री आई हीच आपली सेलिब्रेटी आहे, ही जाण सागर याने ठेवली. सागर यांचे वडील ज्योतिबा पोटे हे मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आहेत. ते ‘‘वणी बहुगुणी डॉट कॉम’’ चे मारेगाव तालुका प्रतिनिधीदेखील आहेत. पत्रकारिता आणि समाजकारण याचे संस्कार पोटे परिवारातच आहेत.
सागर पोटेदेखील आपल्या आई-वडलांचा समाजकारणाचा वसा चालवत आहे. फोटोग्राफर म्हणून आणि मित्र म्हणून तो युवकांमध्ये अत्यंत पॉप्युलर आहे. कामातील तत्परता, सिरियसनेस, कौशल्य, उत्तम संभाषण तसेच उत्कृष्ट सेवा हे त्याच्या यशाचे गमक आहे. ‘‘मॉडलिंग फोटोग्राफी’’च्या माध्यमातून नव्या युवकांनादेखील नवीन रोजगार प्राप्त होईल असा आशावाद सागरने वणी बहुगुणीसोबत बोलताना व्यक्त केला. ‘‘तुका म्हणे माय बापे, अवघी देवाचीच स्वरूपे” या जगद्गुरू तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे तो आपले कार्य करीत आहे.
या कार्यक्रमाला वणी, मारेगाव तसेच झरी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक प्रा. करमसिंग राजपुत, भारती राजपुत, मारेगावचे पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर, ग्रामीण पत्रकार संघ मारेगावचे अध्यक्ष डॉ. माणिक ठिकरे, प्रसिद्ध विचारवंत व वक्ते कपिल श्रृंगारे, पत्रकार अशोक कोरडे, अनिल लाकडे, उमर शरीफ, नागेश रायपुरे, संजय कालर, संभाजी ब्रिगेडचे झरी तालुक्याचे केतन ठाकरे, संजय गोडे, सुधाकर इंगोले, ऋषिकांत पेचे, मारेगाव मसेसं अध्यक्ष अनामिक बोढे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.