विदर्भा आणखी खवळली, शेतीचे प्रचंड नुकसान
आणि टळला अनर्थ... अन्यथा ही गावं झाली असती नामशेष
निकेश जिलठे, वणी: गेल्या तीन दिवसांपासून घोन्सा परिसरात सलग पाऊस सुरु आहे. त्यामुळे या परिसरातून वाहणा-या विदर्भा नदीला पूर आला असून त्यामुळे घोन्सा, इजासन, परसोडा, कुंभारखनी, गोंधाळा, दहेगाव, साखरा, इत्यादी गावांना त्याचा फटका बसला आहे. विदर्भाच्या प्रवाहाने परिसरातील शेती खरडून नेली आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या पावसाची संततधार सुरूच असून ही संततधार थांबली नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
घोन्साच्या पुढे पाच किलोमीटर पेंढरी गावाजवळून विदर्भा नदी वाहते. ही नदी पुढे तेजापूरजवळ पंनगंगा नदीला जाऊन मिळते. या पट्यामध्ये जेवढे गाव आहेत त्या सर्व गावांना विदर्भा नदीच्या पुराचा फटका बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान शेतीचे झाले आहे. शेतक-यांची संपूर्ण शेती हा प्रवाहात खरडून गेली आहे. शेतामध्ये शेतीपयोगी असलेले दगड, शेतीला असलेले कंम्पाउंड, ओलिताचे पाईप, नदीवरील मोटार सर्व काही हा प्रवाहात वाहून गेले. पुराने घोन्सा दहेगाव गोंधाळा, साखरा या गावातील शेती प्रभावित झाली आहे.
सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरू होता. मध्ये पावसाने विश्रांती घेतली मात्र पुन्हा पावसाने जोर धरायला सुरूवात केली. त्यामुळे घोन्सापासून सहा-सात गावांचा संपर्क तुटला आहे. घोन्साजवळील विदर्भ नदीवरील पुलाचा रस्ता फुटल्याने वाहतूक खोळंबली होती. मात्र घोन्सा येथील काही तरुणांनी एकत्र येऊन हा गड्डा बुजवला. व येण्याजाण्यासाठी तात्पुरती सोय केली. त्यामुळे हा रस्ता पूर्ववत सुरू झाला आहे. तर घोऩ्सातील 30-40 घरांमध्ये पुराचे आणि अतीवृष्टीचे पाणी शिरले. यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी इलेक्ट्रिकचे पोल पडल्याचेही समोर येत आहे.
आणि टळला अनर्थ… अन्यथा ही गावं झाली असती नामशेष
वेकोलि घोन्सा ओपन कास्टमध्ये फुलोरा, जगलोन या नाल्याच्या वळणीकरणासाठी खोदकाम करण्यात आले होते. मात्र विदर्भा नदीचे पाणी पुराचे पाणी वाढल्याने ते पाणी बांधाला अडले. त्यामुळे हे पाणी (बॅक वॉटर) घोन्सातील घरांमध्ये शिरले. वेकोलिने घोन्साजवळ टाकलेला बांध फुटला. पण सुदैवाने हे पाणी सरळ दुस-या मार्गाने बाहेर निघून गेलं. हे पाणी जर दुस-या मार्गाने निघाले नसते तर कुंभारखनी इजाजन आणि परसोडा ही गाव नामशेष झाली असती.
वृत्त लिहेपर्यंत अद्याप कोणत्याही प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा राजकीय नेत्यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि माजी झेडपी सदस्य दिलीप काकडे ‘वणी बहुगुणी’शी बोलताना म्हणाले की….
शेतक-यांनी आधीच तिबार पेरणी केली आहे. मात्र या पुरामध्ये शेती पूर्ण वाहून गेली. त्यामुळे शेतक-यांवर चौथ्यांदा पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यातच बँक शेतक-यांना लोन देण्यास चालढकल करत आहे. गेल्या पेरणीमध्ये नुकसान झालं आता पुन्हा हे संकट ओढवलंय. नेरड पुरडसह विदर्भाच्या पूर्ण पट्यात ही परिस्थिती आहे. त्यामुळे घोन्सा परिसरात सर्वे करून शेतक-यांना लगेच नुकसान भरपाई द्यावी. तसेच शेतक-यांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून द्यावे….. अशी मागणी दिलीप काकडे यांनी केली आहे.
घोन्सा ओपन कास्टमध्ये घुसले पाणी पाहा व्हिडीओ….