बरेली: २९ वर्षांपूर्वी रेल्वे प्रवासात एका प्रवाशाला लुबाडल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील बरेलीतील न्यायालयाने दोन जणांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ३७0 रुपयांच्या चोरीसाठी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून चोरट्यांना १0 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चंद्रपाल, कन्हैय्यालाल आणि सर्वेश असं या तीन चोरट्यांची नावं आहे.
या तिघांनी ऑक्टोबर १९८८ मध्ये रेल्वे प्रवासादरम्यान एका प्रवाशाला लुबाडले होते. गुंगीचे औषध देऊन त्याच्या खिशातील ३७0 रुपये घेऊन चोरट्यांनी पळ काढला होता. चहामधून या तिघांनी त्या प्रवाशाला गुंगीचे औषध दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांवर कारवाई केली होती. यातील सर्वेशचा २00४ मध्ये सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. तर उर्वरित दोन्ही आरोपींनी वयाची साठी ओलांडली आहे. तर यातील तक्रारदार वाजिद हुसैन हे आता ५८ वर्षांचे झाले आहेत.
१९८८ मध्ये वाजिद हे शाहजहानपूरवरून पंजाबला रोजगारासाठी जात असताना ही घटना घडली होती. ते २0१२ मध्ये सुनावणीसाठी न्यायालयात आले होते. त्यानंतर ते सुनावणीला आलेच नाही. न्यायालयाच्या निकालावर दोन्ही दोषींनी इंग्रजी वृत्तसंस्थेशी बोलताना प्रतिक्रिया दिली. तरुण रक्त असल्याने आमच्या हातून हा गुन्हा घडल्याचे दोघांनी सांगितले. आम्हाला झालेल्या शिक्षेपेक्षा २९ वर्षे चाललेला खटला हा जास्त त्रास देणारा होता, असे त्यांनी सांगितले.
चंद्रपाल आणि कन्हैय्यालाल या दोघांची मुले-मुलीही मोठे झाले आहेत. खटल्यातील निकालांसाठी न्यायालयात होणारा विलंब हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सरकार बदलले पण न्यायालयीन कामकाजाला काही गती मिळालेली नाही, हेच या प्रकारावरून दिसते.