सुनील इंदुवामन ठाकरे, अचलपूरः विदर्भातील अचलपूर येथील सत्पुरूष श्रीमत् परमहंस रामकृष्णानंद स्वामी शेवाळकर महाराज यांचा शताब्दी पुण्यतिथी महोत्सव दि. 19 ते 25 ऑगस्टपर्यंत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी साजरा झाला. स्थानिक माळवेशपुऱ्यातील शेवाळकर सभागृह येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन या निमित्ताने शेवाळकर कुटुंबियांनी केले.
या सात दिवसांच्या महोत्सवात श्रीमद् भागवताचे संहिता वाचन, श्री विष्णू, रुद्र, गणेश, सूर्य व देवी या देवतांचे महायज्ञ, ह.भ.प. मोहनबुवा कुबेर यांची दोन सुश्राव्य कीर्तने तसेच ‘‘हे तो ईश्वराचे देणे’’ या पुस्तकिचे प्रकाशन आणि निःशुल्क ज्योतीष्य निदान व निःशुल्क आयुर्वेद रोगनिदान शिबीर इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 25 ऑगस्ट रोजी श्रीदेवी महायज्ञ होऊन पंच महायज्ञांची सांगता महाप्रसादाने झाली.
ज्योतीष्य शिबिरात जैमिनी ज्योतीष्यकार विनय कुऱ्हेकर, हस्तसामुद्रिक शशांक कुळकर्णी, समग्र ज्योतीष्यकार डॉ. ज्ञानेश्वर कुळकर्णी, प्रश्नकुंडली तज्ज्ञ प्रसन्न मुजुमदार यांनी नागरिकांच्या शंकांचे समाधान केले. निःशुल्क आयुर्वेद रोगनिदान शिबिरात नागपूर येथील पारिजात आयुर्वेदचे वैद्य नीतेश कोंडे, विशाल निमसडे, हितेश काटणकर व प्रणय देशमुख तसेच अमरावती येथील विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाचे वैद्य वैशाली वानखडे, रवींद्र वाघमारे, नीलेश इंगळे, शिल्पा देशपांडे, मंगेश मालपे, नीता मडावी, संजय मोरे आणि शिवानी भवरेकर यांनी रुग्णांची तपासणी करून गरजूंना मोफत औषध वाटप केले.
पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने ‘हे तो ईश्वराचे देणे’ या पुस्तकाचे ह.भ.प. मोहनबुवा कुबेर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात ज्यांच्या दरवर्षी शेवाळकर कुटुंबियांकडून पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात त्या रामकृष्णानंद स्वामी महाराज, बाबासाहेब गढीकर महाराज व भाऊसाहेब शेवाळकर महाराज यांची संक्षिप्त चरित्रे, त्यांच्या आरत्या व अष्टके तसेच गेल्या 100 वर्षांत पुण्यतिथीमित्त जे कार्यक्रम साजरे झाले त्याचा गोषवारा देण्यात आला आहे. तिन्ही महाराजांची चरित्रे, प्राचार्य राम शेवाळकर यांच्या ‘पाणीयावरी मकरी’ या आत्मचरित्रातून घेतली आहे. पुस्तकाचे संपादन माधव सरपटवार यांनी केले. विमोचनाकरिता पुस्तक दिंडीद्वारे पालखीतून व्यासपीठावर आणली होती.
पुण्यतिथीच्या सात दिवसांच्या महोत्सवात महाराजांच्या व्यासंगाचे व आवडीच्या विषयांच्या संदर्भाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महोत्सवात प्रा. कृष्णराव जिरापुरे व त्यांच्या संचाने सादर केलेल्या भजनाने रंगत आणली. पुण्यतिथी शताब्दी वर्षात अचलपूरसह नागपूर, वणी इत्यादी ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. आयोजित सर्व कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पुण्यतिथी महोत्सवाकरिता मुंबई, अकोला, नागपूर, अमरावतीसह मराठवाड्यातून महाराजांचे अनेक आप्त व भक्त उपस्थित होते.
00000000000000
मा. संपादक, प्रतिनिधी
कृपया प्रकाशनार्थ