मुंबई: रिलायंस जिओनं शुक्रवारी जिओचा फिचर फोन ‘जिओ फोन’ लॉन्च केलाय. मुंबईत रिलायंन्सची सर्वसाधारण बैठक शुक्रवारी झाली. या कार्यक्रमात हा फोन लॉन्च करण्यात आला.
जिओ फोनचा वापरणे खूपच सोपे असणार आहे आणि हा जगातला सर्वात अफॉर्डेबल फोन असेल. हा 4G फोन असेल. जिओ फोन देशातील मुख्य 22 भाषांना सपोर्ट करेल. त्यासोबतच हा फोन तुमच्या आवाजाने ऑपरेट केला जाईल. जिओच्या या फिचर फोनमधून व्हॉइस कमांड द्वारे तुम्ही मेसेज पाठवून शकता आणि कॉल करू शकता. हा फोन फुकट असून फोनसाठी केवळ 1500 रूपये अनामत रक्कम असणार आहे.
मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, ‘40 वर्षात रिलायंसच्या कर्मचा-यांची संख्या वाढून 2,50,000 झाली आहे. प्रत्येक अडीच वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. त्यासोबतच या 40 वर्षात रिलायंस इंडस्ट्रीजचा फायदा 10 हजार टक्क्यांनी वाढला आहे. यावेळी बोलताना मुकेश अंबानी यांनी धीरूभाई अंबानी यांचा उल्लेख केल्याने त्यांच्या पत्नी कोकिळाबेन भावूक झाल्या होता.
ते पुढे म्हणाले की, ‘जिओने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. 170 दिवसांमध्ये जिओसोबत 10 कोटी ग्राहक जुळले आहेत. जिओने प्रत्येक सेकंदात 7 नवे ग्राहक जोडले आहेत. जिओला केवळ 10 महिने झाले आहेत तरीही जिओने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. कधी विचारही नव्हता केला की, हे इतकं वाढेल’.
‘जिओ ग्राहक एका महिन्याला 125 कोटी गीगाबाइट डेटा वापरत आहेत. मोबाईल डेटा वापरण्याच्या बाबतीत जिओने अमेरिका आणि चीनला मागे टाकले आहे. लोक म्हणाले होते की, फ्री ग्राहक सेवांसाठी पैसे देणार नाहीत. मात्र जिओ यूजर्सने त्यांना चुकीचं ठरवलं आहे, असंही ते म्हणाले.