नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील मध्यवस्तीत असलेले देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी मतदान घेण्यात आले मात्र मतमोजणीसाठी ऐन वेळेवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने देशी दारुचे दुकान पुन्हा मोठ्या थाटात सूरू आहे. त्यामुळे महिला वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवरगाव येथील देशी दारूचे दुकान हे शाळा व मंदिर परिसराच्या नजीक असल्याने गावातील विधार्थी व युवक वर्ग दारुच्या आहारी जाऊन येथील अनेक संसार उद्धवस्त झाले. याविरोधात महिला शक्ती एकवटली. दारूचे दुकान बंद करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून त्या संघर्ष करीत आहे. अखेर महिलाशक्तीच्या संघर्षाला यश आले.
30 सप्टेंबर रोजी देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी मतदान घेण्यात आले. मतदानात 625 पैकी 419 महिलांनी मतदान केले. परंतु देशी दारुच्या दुकानदारानी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने मतमोजणीसाठी स्थगिती आली. परिणामी महिलांचा हिरमोड झाला. त्यामुळे महिला संतप्त झाल्या आहेत.
मतमोजणीवर स्थगिती आणल्याची पूर्वकल्पना का देण्यात आली नाही असा सवाल विचारून महिलांनी प्रशासकीय अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. आता मतमोजणी कधी होते याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.