आमदार बच्चू कडूंना अटक

आयुक्तांवर हात उगारल्याचा आरोप

0

नाशिक: आमदार बच्चू कडू यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसंच महापालिकेच्या आयुक्तांवर हात उगारल्याचा त्याच्यांवर आरोप आहे. या प्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्थानकात आमदार कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.. अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी झाली नसल्याच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांना घेराव घातला होता.

नाशिक महापालिकेने 1995 अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच, अपंगांचा राखीव तीन टक्क्यांचा निधीही आजवर खर्च झाला नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून आमदार बच्चू कडू आणि त्यांचे समर्थक आक्रमक झाले होते. त्यांनी मनपा मुख्यालयासमोर दुपारी बारा वाजेपासून प्रहार संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू केले.

दरम्यान, आंदोलन सुरूच असताना आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. आयुक्तांसोबत चर्चा करताना काही शाब्दिक वादावादी झाली. या वादावादीदरम्यान कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी अधिकाऱ्याला थेट शिवगाळ करण्यास सुरूवात केली. आयुक्त कृष्णा यांच्या अंगावर धावून जात त्यांनी हातही उगारला. मात्र, शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार कडूंना वेळीच रोखले आणि पुढचा अनर्थ टळला.

या घटनेनंतर महापालिका आणि परिसरात तणावाचं वातावरण असून,  शरणपूर रोडवरील महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात अद्यापही तणाव आहे. याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.