झरी तालुक्यातील युवक व विद्यार्थी ड्रग्सच्या विळख्यात
गांजा, अफीम, कोरेक्स व आयोडेक्सचा नशेकरिता वापर
सुशील ओझा, झरी: आजच्या युगात युवक युवती तसेच हायस्कूल व सिनियर कॉलेजचे विद्यार्थी यांना फॅशनचं वेड लागलं आहे. चित्रपट, टीव्ही चॅनलवरील सिरीयल्समधील अश्लील कृत्य व नशा करणे इत्यादी गोष्टीचा प्रभाव आजच्या युवक व युवतींवर इतका पडला आहे की, आज आपण कोणत्या मार्गावर जात आहो याचेसुद्धा त्यांना भान नाही. नशेकरिता आजचे तरुण एवढे पुढे गेले की त्यांनी नशेकरिता वेगवेगळे शोध लावले आहे. गांजा, अफीम या गोष्टी ऐकायला मिळाल्या; परंतु तालुक्यात या दोन मादक वस्तूंव्यतिरिक्त खोकल्याकरिता वापरण्यात येणारे औषध कोरेक्स याचा वापर सर्रास नशेकरिता होत आहे. आयोडेक्स या मलमाचा शरीराला दुखणे, सूज येणे याच्यावर मालिशकरिता वापरल्या जाणाऱ्या औषधी ब्रेडला लावून खात आहे ज्यामुळे नशा येते.
टॉर्चकरिता वापरणारे सेल ज्याला फोडून त्यातील पांढरी पावडर(अॅसिडसारखा) काढून एक ग्लास पाण्यात टाकून पाणी गाळूनसुद्धा पितात याहीमुळे नशा येतो असे म्हणून पीत असल्याची माहिती आहे. परंतु परिसरातील शालेय विद्यार्थी गांजा व अफीमच्या नशेत गुरफटले असून ते आपल्या जीवनाशी खेळ करत आहे . तर या नशेत काही तरुणीसुद्धा असल्याची माहिती मिळाली आहे. मुकुटबन परिसरातील जंगल, लेआऊट, रात्रीच्या वेळेस रस्त्यावर तर काही चौकांतसुद्धा गांजाची चिलम बिनधास्त ओढत आहे. कधी पार्टीमध्ये गांजाचा वापर होत आहे. कधी कधी तर भर रस्त्यावर चारचाकी थांबवून गाणे वाजवत नाचत चिलमेचा घोट घेत एन्जॉय करत असल्याची माहिती हाती लागली आहे. मुकुटबन येथील गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या परिसरातील जंगलालगत चार युवक गांज्या चिलमने फुंकत असताना आढळले. परंतु पोलीस आल्याचे दिसताच तीन ते चार तरुण युवक आपली दुचाकी सोडून पळून गेले पोलिसांनी दुचाकी चिलम व एक पुडी गांज्या जप्त केल्यात.
या नशेत अल्पवयीन शाळकरी मुलेसुद्धा सामील असल्याची माहिती आहे. नियमाने औषधी विक्रेत्यांना कोरेक्स खोकल्याची औषध एमबीबीएस डॉक्टरच्या चिट्ठी शिवाय देता येत नाही. परंतु पैसे कमविण्याच्या नादात कोरेक्स औषधी विकत आहे. शालेय विद्यार्थी आपल्या पाल्यांना अंधारात ठेवून हे नशेचे कृत्य करीत आहेत. आपले पुढील भविष्य अंधकारमय करीत आहे. तालुक्यात अल्पवयीन मुले दारूच्या व्यसनात जास्त प्रमाणात असताना अजून नवीन संकट उभे झाले आहे. परिसरासह तालुक्यात गांजा, अफीम इतर कोणतेही नशेच्या वस्तू आणून विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी होत आहे.