बहुगुणी डेस्क, वणी: रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांचं डेरिंग दिवसेंदिवस वाढतच आहे. चोरटी वाहतूक तर होतच आहे. पण त्यासोबत त्यांचा उर्मटपणा शासकीय कर्मचाऱ्यांच्या कधी जिवावर बेतेल हे सांगता येत नाही. झरी तालुक्यातील टाकळी रेती घाटावर गुरुवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 07.30 वा. सुमारास एक भयंकर नाट्यमय थरार घडला. त्यात शासकीय अधिकाऱ्यांचा जीव जाता जाता थोडक्यात बचावला. बरं एकाच दिवशी, एकाच जागेवर पुन्हा दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने, विभागात प्रचंड खळबळ माजली. पाटणबोरीचे मंडळ अधिकारी एम. के. कुळसंगे यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार गुरुवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 07.30 वाजण्याच्या सुमारास महसूल विभागाचं पथक झरी तालुक्यातील टाकळी रेतीघाटावर पोहचलं. केळापूरचे उपविभागीय अधीकारी, तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमीत रंजन, नायब तहसिलदार किशोर वासुदेव सयाम व अन्य अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारावर घटनास्थळी भेट दिली. तिथं नंबर प्लेट नसलेला एक ट्रॅक्टर रेतीने भरलेला आढळला. या अधिकाऱ्यांनी त्यास थांबवून चौकशी केली सुरू केली. तेव्हा पाटणबोरीचा ट्रॅक्टर चालक मंचला राजू (30) याने अधिकाऱ्यांचे आदेश पहिल्यांदा धुडकावलेच. मग तिथून जबरदस्तीने ट्रॅक्टर चालवून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु उपविभागीय अधिकारी यांचे वाहनचालक विनोद हिवरकर व उपविभागीय अधिकारी यांचे सुरक्षारक्षक निखील सलाम यांनी तो ट्रॅक्टर पकडला. त्या दरम्यान ट्रॅक्टरचालक मंचला राजू तिथून पळ काढून पसार झाला.
त्यानंतर थोड्याच वेळाने पाटणबोरीचाच दुसरा ट्रॅक्टर चालक गोपाल वायकर (35) आला. त्यानेही अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता जबरदस्तीने रेतीचा ट्रॅक्टर पळवला. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता अंगावर गाडी आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही रेतीचे ट्रॅक्टर चालक हे पल्सर बाईकने तिथे आले होते. त्यानंतर बबन गजानन कोलेकर व प्रकाश वायकर तसेच गणेश धोत्रे व अर्जुन रामलू कोलेकर हे जबरदस्तीने गाडी नेण्याकरीता आले. तिथे त्यांना अटकाव केला व चौकशी केली. तेव्हा त्यांनी जबरदस्ती करून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळेवर टाकळीचे सरपंच, पोलीस पाटील व पोलीस आल्यामुळे त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
त्यामुळे त्यानी दोन्ही बाईक जप्त करुन कार्यालयास आणण्यात आल्या. आरोपींनी सरकारी कामांत अडथळा निर्माण केला. कायद्याच्या अंमलबजावणीस बाधा आली. ही कृती भारतीय न्याय संहितेच्या कलम 132.221, 303, 304, सहकलम खनिज विकास व नियमन कायदा 1957 चे कलम 4(1).21 अंतर्गत तसेच पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 15 प्रमाणे गुन्हेगारी स्वरूपाची आहे. असे मंडळ अधिकारी कुळसंगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले. सोबतच आरोपींवर कारवाई करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.
Comments are closed.