पोहरादेवीत गुरुपौर्णिमा उत्साहात, हजारो शिष्यांनी टेकविला गुरुचरणी माथा

डॉ. रामराव महाराज यांच्यावरच्या विशेषांकाचे विमोचण

0

मानोरा: बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे गुरुपौर्णिमा आणि संत डॉ. रामराव महाराज यांच्या जन्मसोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो शिष्यांनी गुरू राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज यांच्या चरणी माथा टेकून त्यांना अभिवादन केले. महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी जमली होती. यावेळी जय सेवालाल, जय संत रामराव महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी गर्दी केली होती. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच डॉ. रामराव महाराज यांचा जन्मसोहळा असतो. या दुग्धशर्करा योगामुळे भाविकांची पोहरादेवीत एकच गर्दी असते. संत डॉ. रामराव महाराज यांच्या हस्ते माता जगदंबा, जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या चरणी माथा टेकून आशीर्वाद घेतला. त्यानंतर महाप्रसाद वाटण्यात आला.

भाविकांना आशीर्वाद देताना संत रामराव महाराजांनी संदेश दिला. या संदेशात त्यांनी मार्गदर्शन केले की, आई भवानी, संत सेवालाल सजीव सृष्टीला सुखी ठेव, पाऊस पडू दे, अशी आराधना केली. यावर्षी पिकांचे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्वांनी खेळीमेळीने बंधू व समान भावनेने आनंदाने वागावे, असे ही ते म्हणाले.

डॉ. रामराव महाराज यांच्यावरच्या विशेषांकाचे विमोचण
या वेळी डॉ. रामराव महाराज यांच्यावर काढण्यात आलेल्या विशेषांकाचे महाराजांच्या हस्ते विमोचण करण्यात आले. या विशेषांकात संत रामराव महाराज, वसंतराव नाईक तसेच समाजासाठी झटणा-या व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. सोबतच डॉ. श्याम जाधव (नाईक) यांच्या आरोग्यधाम हॉस्पिटलद्वारा करण्यात आलेल्या आरोग्य सेवेचेही विस्तृत असे विवरण करण्यात आले आहे. या विशेषांकाच्या 50 हजार प्रती पोहरादेवीमध्ये वाटण्यात आल्या.

विमोचण प्रसंगी बोलताना संत रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्याम जाधव (नाईक) म्हणाले की… 
संत सेवालाल महाराजांनी दिलेले विचार, त्यांची क्रांती जिवंत ठेवण्याचं कार्य गुरू रामराव महाराज करीत आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा आपण प्रामाणिकपणे पुढे चालवायला हवा. समाज व्यसनमुक्त समाज व्हावा यासाठी महाराज कायम झटले. ज्या व्यक्ती महाराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन जगले ते आज व्यसनांपासून तर दूर आहेत. मात्र त्यासोबतच ते प्रतिष्ठीत जीवनही जगत आहे. व्यसनमुक्त समाज घडवणे हीच डॉ. संत रामराव महाराज यांना गुरुदक्षिणा होऊ शकते.

देशभरातील हैद्राबाद, कर्नाटक , तेलंगणा व जालना जिल्ह्यातील गुलखंड, पाटोदा, परतूर, बीड, नांदेड, परभणी, जालना, जिंतुर, यासह यवतमाळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील पायदळ दिंड्या या गुरुपौर्णिमेला काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे दाखल झाल्या होत्या. या दिंड्यांमध्ये जय सेवालाल, बोलो जय सेवालाल आदींचा गजर करण्यात आला. कानाकोपऱ्यातून आलेल्या या पायदळ दिंड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गुरुपाौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आयोजकांसह स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. सेवाआश्रम प्रांगणात हजारो भाविकांनी रांगेने बसून महाप्रसादाचा लाभ घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.