लोढा हॉस्पिटलमध्ये टय़ुमरची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

सुकणेगावच्या महिलेला मिळाले जीवदान

0
निकेश जिलठे, वणी: गेल्या तीन महिन्यांपासून ती पोटदुखी सहन करत होती… पोट दिवसेंदिवस फुगत होते… एक वेळ अशी आली की पोट कोणत्याही क्षणी फुटेल अशी स्थिती निर्माण झाली…. डॉक्टरांनी उपचार सांगितले होते… पण खर्च झेपणारा नव्हता…. ती फक्त अखेरच्या घटका मोजत होती… तिचे कुटुंबीय पैशाअभावी हतबल झाले होते…. मात्र आशेचा किरण दिसला… अखेर तिच्यावर अवघड अशी शस्त्रक्रिया झाली आणि तिला जीवनदान मिळाले… लवकरच तिला रुग्णालयातून सुटी मिळणार आहे…
ही कहाणी आहे सुकणेगावातील एका गरीब महिलेची. तिच्यावर वणीतील लोढा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया करून सुमारे 18 किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. वणीतील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. महेंद्र लोढा व त्यांच्या टीमने ही किमया करून दाखवली आहे. या शस्त्रक्रियेमुळे महिलेचा जीव तर वाचला आहे, शिवाय हॉस्पिटलने शस्त्रक्रियेचा कोणताही खर्च न घेता केवळ औषधोपचाराचा खर्च घेऊन ही शस्त्रक्रिया केल्याने माणुसकीचे दर्शन घडवले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कलावती मारोती मडावी (45) ही महिला सुकणेगाव तालुका वणी येथील रहिवाशी आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तिला पोटदुखीचा त्रास होता. आधी तिने त्यावर त्यावर पोटदुखीवर उपचार करून बघितला. मात्र पोटदुखी थांबण्याचे काही चिन्ह नव्हते. पुढे दिवसेंदिवस हा पोटदुखीचा त्रास तर वाढत गेला शिवाय पोटाचा आकारही वाढत चालला होता. त्यामुळे तिच्या कुटुंबियांची चिंता वाढत गेली. अखेर तिला वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला स्त्री बिजांडाला ट्युमर झाल्याचे निदान सांगून नागपूरला जाऊन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
कलावतींना नागपूरच्या एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली मात्र त्याचा सुमारे दीड ते दोन लाखांचा खर्च त्यांनी सांगितला. एवढे पैसे नसल्याने कलावतीच्या कुटुंबियांनी तिला गावी परत आणले. ती पोटदुखी सहन करत होती. शिवाय पोटाचा आकार इतका वाढला पोट फुटण्याचा धोका निर्माण झाला. गावातील काही नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी डॉ. महेंद्र लोढा यांची भेट घेतली व याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. लोढा यांनी रुग्णाची भेट घेण्यास सांगितले.

रविवारी दिनांक 14 जुलैला कलावतीच्या कुटुंबियांनी कलावतीला लोढा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. लवकरात लवकर शस्त्रक्रिया न केल्यास पोट कोणत्याही क्षणी फुटू शकण्याचा धोका लक्षात आला. डॉ. लोढा यांनी त्यांच्या सहकारी डॉक्टरांशी संपर्क साधला व सोमवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले.
दिनांक 15 जुलै सोमवारी सकाळी कलावतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यात डॉ. लोढा यांना डॉ. किशोर व्यवहारे, डॉ. अशोक कोठारी, डॉ. गणेश लिमजे, डॉ. शिरीष कुमरवार यांनी सहायक म्हणून सहकार्य केले. बिजांडाच्या गाठीवर शस्त्रक्रिया करताना आणखी एक दुसरीच समस्या दिसून आली. त्या महिलेच्या गर्भाषयातही गाठ असल्याचे दिसून आले. बिजांडाच्या शस्त्रक्रियेसह गर्भाषयाची शस्त्रक्रियाही करण्यात आली. अखेर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सुमारे 18 किलोची गाठ महिलेच्या पोटातून बाहेर काढण्यात आली. सध्या रुग्णाची परिस्थिती धोक्याबाहेर आहे.
शस्त्रक्रियेआधी वाढलेले पोट व ट्युमर काढल्यानंतर पोट

ही शस्त्रक्रिया केवळ महागडीच नव्हती तर खूप अवघड देखील होती. अशा अवघड आणि धोकादायक शस्त्रक्रिया करण्याचा धोका पत्करण्याऐवजी डॉक्टर अशा केस नागपूरला पाठवतात. मात्र महिलेच्या कुटुंबियांना हा खर्च ही परवडणारा नव्हता. अखेर आम्हीच हा धोका पत्करण्याचे ठरवले व शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सध्या गाठीच्या पेशी तपासणीसाठी नागपूरला पाठवण्यात आल्या असून त्याचा अहवाल लवकरच मिळेल. – डॉ. महेंद्र लोढा

या शस्त्रक्रियेत डॉ. महेंद्र लोढा यांच्यासह डॉ. किशोर व्यवहारे, डॉ. अशोक ठावरी, डॉ. गणेश लिमजे, डॉ. शिरीष कुमरवार सहभागी होते. भास्कर घुटके व महादेव स्वामी ओटी सहायक तर कु. पूनम व कु. सलोनी या परिचारिका म्हणून सहभागी होत्या.
Leave A Reply

Your email address will not be published.