कोरोनाच्या लसींचा इंटरनॅशनल गेम

संयमानं कोरोनाच्या संकटांना लढा द्या

0

प्रा. डॉ. संतोष संभाजी डाखरे : कोरोना नामक महामारी या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियाने सर्वप्रथम लस तयार करून बाजी मारली असली तरीही अनेक देशांचा मात्र या लसीवर (संशोधनावर) आक्षेप आहे. अमेरिकेने तर स्पष्ट शब्दात ही लस अमान्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

सोबतच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ञांनी इतक्या कमी कालावधीत लस तयार करणे अशक्‍य असल्याचे म्हटले आहे. खुद्द जागतिक आरोग्य संघटनाही (WHO) या लसीच्या वापराबाबत साशंक आहे. गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोनावरील लसीच्या संशोधनाचे कार्य विविध संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे.

सर्वप्रथम चीनने या संदर्भात संशोधनास सुरुवात केली होती. अद्याप चीनची लस बाजारात यायची आहे. ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका, मॉडर्ना आणि फिजरसारख्या कंपन्या या संशोधनात आघाडीवर होत्या. त्यांनाही रशियाने धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे रशियाच्या या लसीसंदर्भात जागतिक स्तरावर प्रश्नचिन्ह निर्माण होणे साहजिक आहे.

या लसीला अमेरिकेने घेतलेला आक्षेप हा अपेक्षितच होता. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला जे शक्य झाले नाही, ते रशियाने करून दाखवावे. ही बाब त्यांच्या पचनी पडली नाही. त्यातच एका साम्यवादी देशाची लस आपण स्वीकारावी. हेसुद्धा अमेरिकेला सहन होणारे नाही.

रशियाने अवकाशात सर्वप्रथम ‘स्पुटनिक’ नावाचा उपग्रह सोडला होता. त्याच उपग्रहाचे नाव या लसीला देण्यात आले आहे. या नावालासुद्धा अमेरिकेचा विरोध आहे. अमेरिका-रशियामधील शीतयुद्ध संपले असले तरीही अमेरिकेच्या अंतरी रशियाबाबतची असूया मात्र कायमच आहे.

या लसीची विश्वासाहर्ता पटावी म्हणून ब्लादिमीर पुतीन यांनी माझ्या मुलीलाही ही लस टोचण्यात आल्याचे म्हटले आहे. अनेक देशांनी आमच्याकडे या लसीची आगाऊ नोंदणी केली असल्याचे सांगायलाही ते विसरले नाही. भारताने मात्र रशियाच्या या लसीबाबत सावध भूमिका घेतली आहे. नुकतीच केंद्रीय पातळीवर आरोग्य विभागाची एक बैठक झाली. त्यामध्ये रशियाकडून ही लस घेण्यासंदर्भात आणि तिची साठवणूक व वापर करण्यासंदर्भात चर्चा झाली.

भारत, ब्राझील, फिलिपीन्स, सौदी अरेबिया या देशांमध्ये लसीचे उत्पादन करणार असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. ही लस खरी की खोटी ? ती परिणामकारक असेल की नसेल ? हा चर्चेचा विषय असला तरीही भारतासारख्या अनेक देशांना या घडीला लसीची नितांत गरज आहे.

भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २३ लाखांच्यावर गेली आहे. दररोज सरासरी ५० हजारांच्यावर पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत आहे. या दोन आठवड्यात तब्बल ६ लाख ३३ हजार रुग्णांची वाढ झाली आहे. महाराष्ट्र, बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल या राज्यात होणारी रुग्णवाढ चिंतनीय आहे.

काही महिन्यांपूर्वी फक्त महानगरापुरताच मर्यादित असलेला हा रोग आता वस्ती-पाड्यापर्यंतही पोहोचला आहे. रोगप्रतिबंधात्मक सर्वच उपाययोजनांचा अवलंब करूनही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने आता लसीशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. म्हणूनच रशियाच्या लसीकडे सध्या तरी आशेचा एक किरण म्हणून बघण्यास काही हरकत नाही.

दुसरी बाब अशी की, कोरोनाला अजूनही अनेकांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे चित्र आहे. शासन-प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून नियमांना सर्रास पायदळी तुडविणे सुरू आहे. ठिकठिकाणी उसळणारी गर्दी हे त्याचेच द्योतक आहे. आजवर कोरोनाने जगभरात ७ लाखांच्यावर बळी घेतले आहेत.

एकट्या अमेरिकेचा आकडा दोन लाखांच्या घरात आहे. भारतातही ४७,१६९ एवढे लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अनेकांच्या निष्काळजीपणामुळे यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. भारतात या रोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे ३ टक्के आहे. काही लोकांना हे शुल्लक वाटत असले तरीही या तीन टक्क्यांमध्ये आपला समावेश असावा हे कोणालाही आवडणार नाही. भारताच्या सिरम इंस्टिट्यूटची लस बाजारात यायला अवधी आहे. अमेरिकन लसही पुढील वर्षीच येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्यातरी या विषाणूपासून स्वत:चा बचाव करणे इतकेच आपल्या हाती आहे.

प्रख्यात शायर राहत इंदोरी यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ‘डॉन को पकडना मुश्कीलही नही, नामुमकीन है’ असे म्हणणाऱ्या आणि आपल्या आरोग्याबाबत प्रचंड दक्ष असणाऱ्या अमिताभलाही कोरोनाने शोधून काढले आहे. त्यामुळे ‘आम्ही कोरोनाला घाबरत नाही’ या आविर्भावात वावरणाऱ्या तमाम शूरवीरांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

कारण कोरोना आता आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचला आहे. आज सकल मानवजातीचे covid-१९ नावाच्या एका अदृश्य शत्रुसोबत चाललेले हे तिसरे महायुद्धच आहे. शत्रुसोबत समोरासमोर युद्ध करणे शक्य नसते तेव्हा ‘गनिमी कावाच’ उपयोगी पडत असतो. ही शिवरायांची शिकवण तर आपणास ठाऊक आहेच.

कधीकधी शत्रूचे बळ अधिक असेल तर माघार घेणेही शहाणपणाचं ठरतं. अशावेळी भविष्यातील लढाया जिंकण्याकरिता आपले जीवंत असणेच अधिक महत्वाचे असते. याप्रसंगी रणांगणावर रक्ताच्या थारोळ्यात पडूनही लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणार्‍या पराक्रमी ‘दत्ताजी शिंदे’ यांच्या ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ या वाक्याचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही.

प्रा. डॉ. संतोष संभाजी डाखरे

८२७५२९१५९६

Leave A Reply

Your email address will not be published.