वाईगौळ प्रकल्पातील गलथान कारभारामुळे आरोग्यास धोका
डॉ. श्याम जाधव यांची दोषींवर कारवाईची मागणी
मानोरा (प्रतिनिधी) : दिनांक 20 जून गुरूवार रोजी सकाळी वाईगौळ येथील म. जि. प्राधिकरण योजनेअंतर्गत येणा-या प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्रातील पंपगृहात एक कुत्रा मृत अवस्थेत आढळून आला. हा कुत्रा गेल्या 48 ते 76 तासांपासून पाण्यात मृत अवस्थेत असल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात नमुद करण्यात आले होते. या प्रकल्पातून परिसरातील 28 गावांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या तीन दिवसांपासून मृत प्राणी पंपगृहात असल्याने दोन ते तीन दिवस या गावांना दुषीत पाणी पुरवठा करण्यात आला. या प्रकरणी डॉ. श्याम जाधव यांनी संताप व्यक्त करत दोषी अधिकारी व कर्मचा-यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
वाईगौळ येथे दिग्रसजवळ असलेल्या अरुणावती प्रकल्पातून पाणी आणून 28 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी मोठ्या प्रमाणांत निधीचा खर्च केला आहे. परंतु अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणा व गलथान कारभारामुळे पाणीपुरवठा होत असलेल्या मानोऱ्या शहरासह इतर प्रादेशिक 28 गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.
अधिकाधिक रोग होण्याचे मुख्य कारण हे पाणी आहे. मात्र पाण्यासारख्या मुलभूत प्रश्नावर प्रशासन जे बेजबादार पद्धतीचे धोरण राबवत आहे ते धक्कादायक आहे. पाण्यात कचरा आढळणे, पाणी पिवळ्या रंगाचे येणे ही बाब नित्याचीच असताना आता चक्क मृत जनावर असलेले पाण्याचा पुरवठा केल्याने प्रशासनाला सर्वसामान्यांच्या आरोग्याविषयी काही चिंता आहे की नाही हा प्रश्न पडतो. हे प्रकरण अतिशय गंभीर असून यात दोषी अधिकारी व कार्मचा-यांवर कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे. – डॉ. श्याम जाधव (नाईक)