‘तो’ सध्या काय करतो ?
एक्सक्लुझिव्ह मुलाखत: सेवानिवृत्तीनंतर प्रा. डॉ. दिलिप अलोणे यांचा काय आहे नवीन उपक्रम ?
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: प्रा. डॉ. दिलीप अलोणे अनेक कलांचे स्वामी आहेत. नाटककार, अभिनेता, कवी, हस्तकलाकार, निवेदक, शेतीतज्ज्ञ, जादुगर, प्राध्यापक, नकलाकार आणि हरहुन्नरी कलावंत केवळ वणीच नव्हे तर संपूर्ण चाहत्यांमध्ये प्रिय व ख्यातीप्राप्त आहेत. प्राध्यापकीच्या व्यस्ततेतून ते औपचारिकरीत्या ते निवृत्त झालेत. आता हा वेळ, ही ऊर्जा ते कुठे गुंतवतील असा अनेकांच्या मनात विचार आला असेल. त्यांच्या सर्व वर्तृळात हा प्रश्न पडला असेल की, ‘तो सध्या काय करतो?’ या व अशा अनेक प्रश्नांना हात घालत आहे प्रसिद्ध निवेदक आणि कलावंत सुनील इंदुवामन ठाकरे. सुनील यांनी प्रा. डॉ. दिलिप अलोणे त्यांच्याशी केलेल्या गप्पा खास वणीबहुगुणीच्या वाचकांसाठी.
सुनीलः नोकरीत असताना तुम्ही काम विविध उपक्रमात गुंतून असायचे. नुकतेच आपण सेवानिवृत्त झाले आहात. आता निवृत्तीनंतर पुढचं प्लानिंग काय आहे ?
डॉ. अलोणेः माझी नाळच मुळात मातीशी जुळलेली आहे. मी एक शेतकरीपुत्र आहे. शेती माझ्या रक्तात भिणली आहे. त्यामुळे स्वाभाविकच मी यापुढे माझ्या शेतीत, माझ्या झरी तालुक्यातील पाटण या गावात रमणार आहे. अधिकाधिक वेळ मी याच गावाला देणार आहे. या भूमीतूनच करण्यासारखं बरंच काही आहे.
सुनीलः तुमची कर्मभूमी वणी राहिली, आता पुढची कर्मभूमी मग पाटणच राहील काय ?
डॉ. अलोणेः वणीला मी लोकमान्य टिळक महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालो. इथल्या वास्तव्यात मलाच बरेच उपक्रम करता आले. वणी थोडं मोठं आणि सांस्कृतिक पाया असलेलं, कलाप्रेमी आणि रसिक शहर आहे. अगदी सुरुवातीपासूनच इथे नाट्य, साहित्य, संगीत, कला अशा अनेक आयोजनांची रेलचेलच असायची. पाटणला आमची शेती आहे. शेती माझं पहिलं प्रेम आहे. त्यामुळे वणी आणि पाटण यांच्याशी माझं नातं खूप जुनं आहे. ते अगदी आपुलकीचं आणि घट्ट आहे.
सुनीलः शेती आणि नोकरीचे ठिकाण म्हणून पाटण आणि वणी या दोन्ही स्थानांची ओढ आहे काय ?
डॉ. अलोणेः हो, ते तर झालं. पाटणला शेती व वणीला नोकरी असा प्रदीर्घ काळ मी काढला. पण त्याही पुढे जाऊन सांगू इच्छितो की, मला इथे खूप काही करण्यासारखं आहे. मला ते करायचं आहे. पाटण पूर्वी वणी तालुक्यातच होतं. आता ते नवीन झरी तालुक्यात येतं. हा भाग आदिवासीबहुल आणि मागास आहे. या दोन्ही ठिकाणी आंतरसांस्कृतिक संवादाची कमतरता जाणवते. वणी शहर असल्यामुळे प्रगत आहे. आधुनिक सुविधा व तंत्रज्ञानाचा लाभ शहरवासियांना मिळतो. पाटण हे खेडं आहे. अगदी पिढ्यानपिढ्यांपासून लोक इथे राहतात. आता वाहतूकसेवा सुधारल्यामुळे लोकांचा शहरांशी संवाद वाढायला लागला. पाटणची आणि परिसराची संस्कृती भिन्न आहे. वणी परिसराची संस्कृतीदेखील भिन्न आहे. सामाजिक, भौगोलिक, राजकीय, शैक्षणिक अशी विविधता दोन्ही ठिकाणी आहे. मला वणी आणि पाटणमध्ये हा वरील सेतू बांधायचा आहे. या दोन्ही भागांतील संवादाच्या प्रक्रियेला गती द्यावयाची आहे. मला दोन्ही संस्कृतींचा चांगला अभ्यास व प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यामुळे हा संवादाचा एक सेतू मी बांधू इच्छितो.
सुनीलः आदिवासीबहुल पाटण परिसरात आपण काय योजना किंवा विचार केलेत?
डॉ. अलोणेः झरी या आदिवासीबहुल तालुक्यातील पाटण हे गाव आहे. केवळ पाटणच नव्हे तर या संपूर्ण परिसरात अनेक समस्या आहेत. काही दृश्य स्वरूपात आहेत, तर काही अंतर्गत समस्या त्यांच्यात गेल्याशिवाय, समरस झाल्याशिवाय कळणारच नाहीत. त्यांच्यातला एक होऊन त्या समस्या व त्यावरील तोडगे शोधून काढावे लागणार आहेत. खरे पाहता त्यांना त्यांच्या समस्याच काय आहेत, हेदेखील माहीत नाहीत. इथे अनेक गंभीर असे सामाजिक प्रश्न आहेत. ते या समस्यांपासून व त्यांच्या पुढच्या परिणामांपासून अनभिज्ञ आहेत. त्यांना त्यांच्या समस्यांची जाणीव करून देणं हे पहिलं काम आहे. त्यानंतर त्यांच्यात जागृती आणून पुढील वाटचाल करणे तेवढेच आवश्यक आहे.
सुनीलः या परिसरात कोणत्या समस्या आपल्याला प्रकर्षाने जाणवतात ?
डॉ. अलोणेः झरी तालुक्यात कुमारीमातांचा प्रश्न फार गंभीर आहे. या समस्यांसोबतच आरोग्याच्या समस्याही उद्भवतात. स्त्रियां व बालक हे त्या आजारांचे मोठे बळी ठरतात. सुदैवाने माझी तिन्ही मुलं डॉक्टर आहेत. डॉ. संकेत आणि डॉ. अनिकेत व डॉ. रसिका ही माझी मुलं आपली सेवा देतात. आरोग्य शिबिर घेतात. त्या परिसरातील रुग्णांची तपासणी करतात. आरोग्यविषयक जनजागृती करतात. त्यांच्यात आरोग्यविषयक जनजागृती मोठ्या स्तरावर व्यापक स्वरूपात करावी लागणार आहे. मी शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमांतून तिथे आरोग्यविषयक बरंच काही काम करू इच्छितो. येथील तरुण मेहनती आहेत. होतकरू आहेत. त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यास अनेक प्रयत्न करावे लागणार आहे. आदिवासींचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यांचे आर्थिक सक्षमीकरण झाले की बरंच काही साध्य होईल. तरुणांमध्ये हळूहळू जागृती होत आहे. तिची गती वाढवावी लागणार आहे. त्यांना त्यांच्या सामाजिक व भौगोलिक व्यवस्थेनुसार शिक्षण, प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी अनेक माध्यमांच्या सहकार्यांतून प्रयत्नरत राहणार आहे.
सुनीलः आपण अनेक वर्षांपासून शेती क्षेत्रात कायर्रत आणि प्रयोगशील आहात, त्याबद्दल काही सांगा ?
डॉ. अलोणेः मी आधीच सांगितलं की माझी नाळ ही शेतीशी जुळलेली आहे. मी स्वतः अनेक वर्षांपासून शेती करीतच आहे. शेतक-यांना कमी खर्चात फायद्याची शेती कशी करता येईल यासाठी मी अनेक प्रयोग केलेत. तूर, चणा अशा अनेक बियाणांवर संशोधन केले. केवळ ग्रामीण भागांतच नव्हे तर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राज्यस्थान, कोटा, उज्जैन येथे मी अनेक शेतीविषयक शिबिरे व कार्यशाळा घेतल्यात. मी सातत्याने शेती विषयांवर लेखन केले आहे व करतो आहे.
सुनीलः एक कलावंत आणि शेतकरी म्हणून तुम्ही काही प्रयोग केलेत, ते सांगा ?
डॉ. अलोणेः मी एक शेतकरी आहे. तसाच मी कलावंतदेखील आहे. मी शेती व कला या दोन्ही क्षेत्रांत अनेक प्रयोग केले आणि करीतच असतो. जादुगर म्हणून डोळ्यांवर पट्टी बांधून मी शहरातून मोटरसायकल चालवल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शी आहेत. नाट्य, साहित्य, कला अशाही क्षेत्रात मी सतत प्रयोगशील असतो. मी लेखक, अभिनेता व दिग्दर्शक आहे. या गुणांचा उपयोग करून मी शेतीसाठी ‘शेती फायद्याची’, ‘आडवी पेरणी उताराला’, ‘स्वप्न हिरव्या क्रांतीचे’, आत्महत्त्याग्रस्त शेतक-यांचा विषय घेऊन ‘गर्भात मातीच्या, दिस सोनियाचा’, ‘अशी बहरली संपदा’ ह्या शॉर्टफिल्म्स बनवल्यात. तसेच साक्षरता मोहिमेसाठी ‘अक्षरकिमया’ हा छोटासा चित्रपटही तयार केला होता. आत्महत्त्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांचे आणि परिसरातील शेतक-यांचे मनोबल वाढवण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सहकार्याने वणी ते आर्णी या आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील मार्गाने दिंडी काढली होती. या दिंडीचा समारोप दाभाडी या आत्महत्त्याग्रस्त गावात झाला होता. या अभियानात ग्रामीण तसेच शहरी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे त्यांचा शेती आणि शेतक-यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांच्यात सकारात्मक विचार रुजलेत.
सुनीलः निवृत्तीनंतर कलाक्षेत्रात तुमची पुढील वाटचाल काय राहील?
डॉ. अलोणेः मी कलाक्षेत्रात आयुष्य गुंतवले. मला लोककलांना एकत्र आणण्याची संधी सेवानिवृत्तीनंतर मिळाली आहे. पाटण हे आंध्रपदेशाच्या सीमेजवळ आहे. तेथील कला व संस्कृतीची देवाण-घेवाण होण्यासाठी मी प्रयत्नरत आहे. मी काही वर्षांपूर्वी वणीला मोठा नकला महोत्सव घेतला होता. नकला ही वैदर्भीय लोककला आहे. मी स्वतः नकला क्षेत्रात कार्य करतो. अनेक पुरस्कारांनी मला सन्मानित करण्यात आले आहे. नवीन नकलाकारांची पिढी मी घडविण्यासाठी सहकार्य करतो. मार्गदर्शन करतो. काही चित्रपटांच्या ऑफर्स आल्यात. मी छंद म्हणून ते काम करणारच आहे. सोबतच शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृतीचा माझा मानस आहे. आंध्रप्रदेशाच्या सीमेवर असल्याने आणि मला स्वतः तेलगू ही भाषा उत्तमरीत्या येत असल्याने मला, या दोन राज्यांतील आंतरसांस्कृतिक संवादासाठी बरंच काही करण्यासारखं आहे. ऑक्टोबर 2017 ला मी ‘झरी तालुका सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित करीत आहे. माझे जुने विद्यार्थी अनेक दशकांपासून माझ्याशी जुळलेले आहेत. युवा महोत्सव, सांस्कृतिक महोत्सव आणि अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मी सदैव सहकार्य करायला तयार आहे.
सुनीलः तुमचं कोणत्या कलेत मन अधिक रमतं ?
डॉ. अलोणेः माझं मन शेतीमध्येच अधिक रमतं. त्यात निर्भेळ आनंद मिळतो. समाज आपल्यासोबत अपेक्षेने वागतो. झाडं वा निसर्ग हा निस्वार्थपणे आपल्याशी बोलतात. गप्पा करतात. संवाद साधतात. ते भरभरून देतच असतात. अत्यंत विलक्षण आनंदाचं ते स्रोत आहे.
सुनीलः कलाकार ते सामाजिक कार्यकर्ता असा नवीन प्रवास सुरू झाला काय?
डॉ. अलोणेः कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला हा खूप चर्चेचा विषय आहे. मात्र प्रत्येक कलावंत हा समाजजागृती करतच असतो. समाजभान निर्माण करण्याचं, लेखक, कवी, कलावंत हे कार्य करीतच असतात. कलावंत आपली कला वापरून हे कार्य अधिक चांगल्यारीतीने करू शकतात. त्याचा प्रभावही अत्यंत सकारात्मक ठरतो.
सुनीलः कलावंताची प्रेयसी आणि त्यानंतर बायको अशी तुमच्या पत्नीचीदेखील तुमच्या कारकीर्दीत खूप महत्त्वाची भूमिका असेल ?
डॉ. अलोणेः अर्थातच माझी पत्नी सौ. देवयानी माझे ऊर्जास्रोत आहे. ती माझी प्रेरक शक्ती आहे. तिचं पाठबळ अमूल्य आहे. ती स्वत कलावंत आहे. तिला कलावंताच्या आयुष्याची उत्तम जाण आहे. माझे कार्यक्रमाचे दौरे, मुलांचे संगोपन, येणा-या जाणा-यांची व्यवस्था हे सगळे ती आजही मोठ्या उत्साहाने व कौशल्याने करते. सगळया कुटुंबाचा आधार मोलाचा ठरला आहे. माझं कुटुंब आता खूप मोठं झालं आहे. त्यात विद्यार्थी, मित्र, कलावंत, शेतकरी, माझ्या परिसरातील ग्रामवासी, वणीकर हे सगळे सगळे माझेच कुटुंबीय आहे. सेवानिवृत्ती ही एक संधी आहे, इतर गोष्टींपासून निवृत्त होऊन केवळ सेवा करण्याची. शेवटच्या श्वासापर्यंत माणूस म्हणून माझ्या प्रयत्नात कमी पडू देणार नाही. माझ्यावर प्रेम करणा-या सर्वांचे आभार.
सुनीलः सर आपल्या सत्कार्यात आपल्याला यश लाभो. दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीकरिता सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार.
डॉ. अलोणेः धन्यवाद !
प्रा. दिलिप अलोणे यांना मिळालेले पुरस्कार:
- सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा ‘लोककला’ पुरस्कार
- महाराष्ट्र शासनाचा कृषिविभागाचा ‘शेतीमित्र’ पुरस्कार
- अमरावती विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कार
- सलग दोनदा अमरावती विद्यापीठाचा ‘अभिनव उपक्रम’ पुरस्कार
- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा ‘जीवन गौरव पुरस्कार’
[…] ‘तो’ सध्या काय करतो ? […]