कविता ते संपादकत्व… पांडेजींचा ‘दबंग’ प्रवास !

दै. सकाळचे संपादक आणि साहित्यिक शैलेश पांडे यांची एक्सक्लुझिव मुलाखत

0

पांडे परिवार तसा हिंदी भाषक. त्यांना इंगजीचा प्राध्यापक व्हायचं होत. कालचक्रातून वेगळंच काही झालं. आकाशवाणीची नोकरी सोडून ते पत्रकारितेकडे वळले. तेही चक्क मराठी पत्रकारितेकडे. दोस्तासोबत सहज न्यूजपेपरच्या ऑफीसला जाता जाता आज ‘सकाळ’ या प्रतिष्ठीत दैनिकाचे ते संपादक झालेत… ‘अवतीभवती’, ‘सुकून की इक बूंद’ ‘ओलसावली’ हे पुस्तक देखील प्रकाशित झाले. मारेगाव तालुक्यातल्या करणावाडीच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून त्यांचा प्रवास सुरू झाला. तेच शैलेश पांडे आज साहित्य व पत्रकारितेत एक ब्रॅण्ड झाले आहेत…. रविवारी वणीमध्ये जिल्हा साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे ते उद्घाटक आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक सकाळचे संपादक शैलेश पांडे यांच्याशी मुक्तसंवाद साधला कवी, लेखक व निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी.

 

सुनील इंदुवामन ठाकरेः आपण तसे मारेगावचे; पण वणीशी आपलं काय नातं राहिलं?

शैलेश पांडे: माझं प्राथमिक शिक्षण करणवाडीला जिल्हा परिषद शाळेत झालं. वडील शिक्षक होते. दहावीपर्यंतचं शिक्षण मारेगाव येथेच झालं. पुढील शिक्षणासाठी मला वणीलाच येणं अपरिहार्य होतं. कारण त्या काळात कॉलेज फक्त वणीलाच होतं. माझी शैक्षणिक आणि आयुष्याची महत्त्वाची जडणघडण वणीलाच झाली.

 

सुनील इंदुवामन ठाकरेः वणीला आल्यावर लोकमान्य टिळक महाविद्यालयातील आपला अनुभव कसा राहिला?

शैलेश पांडे: वणीला मी 1983 ते 89 या काळात खोली करून राहायचो. लोकमान्य टिळक महाविद्यालयात अकरावी विज्ञानला प्रवेश घेतला. प्राचार्य राम शेवाळकर यांची कारकीर्द व वैभव आम्हास उपभोगावयास मिळालं याचा आनंद आहे. कॉलेजमध्ये पोस्टर पोएट्री, हस्तलिखित अनियतकालिक असे उपक्रम नियमितच चालायचे. त्यामुळे मी नियमित लिहायला लागलो. प्रा. शांताराम कवडे, प्रा. दिलीप अलोणे ही मंडळी सातत्याने मार्गदर्शन करायची. ख-या अर्थाने लिहिण्याचा कॉन्फिडन्सच मुळात मला कॉलेजच्या मॅग्झिनपासून आला.

सुनील इंदुवामन ठाकरेः अकरावीत म्हणजे ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर तुमची कविता इथेच फुलली म्हणायची?

शैलेश पांडे: प्राचार्य शेवाळकरांच्या नेतृत्वात कॉलेजमध्ये रौनक होती. आमचे शिक्षकदेखील अत्यंत प्रतिभावंत होते. मी कविता आधीदेखील लिहायचो. इथल्या अत्यंत पोषक वातावरणात माझी कविता बहरली. ती फुलली. ती समृद्ध झाली. एक मजेशीर किस्सा सांगतो. माझा एक चित्रकार मित्र होता. त्याला त्याच्या प्रेयसीच्या डोळ्यांवर कविता लिहून हवी होती. त्याने मला गळ घातली. मी मस्त एक कविता लिहिली. ती कविता त्याने त्याच्याच नावाने तिला पाठविली. त्याच्या प्रेयसीला ती कविता प्रचंड आवडली. कवितेचे श्रेय त्याला मिळाले होते; पण मी सर्वाधिक सुखावलो होतो.

 

सुनील इंदुवामन ठाकरेः तुमचं कॉलेजमध्ये इंग्रजी लिटरेचर असताना तुम्ही मराठी लिटरेचरचे लेक्चर्स करायचे ?

शैलेश पांडे: माझा पदवीला इंग्रजी लिटरेचर हा विषय होता. मला करिअरदेखील त्यातच करायचं होतं. प्राचार्य शेवाळकरांसारख्या महान विभूतींच्या व्याख्यानांचा लाभ प्रत्यक्ष मिळायचा. हा मोह मी टाळू शकत नव्हतो. तशी हिंदी आमची मातृभाषा. मला करिअर करायचं होतं इंग्रजीत आणि मी सोबतच प्रेमात पडलो ते मराठीच्या. तसा हा भाषांचा ‘लव्ह ट्रँगल’च झाला. मी अधूनमधून आमच्या ‘सकाळ टाईम्स’ या इंग्रजी संस्करणासाठी लेखन करतोच. माझे हिंदी व मराठीत कवितासंग्रह व पुस्तकेदेखील प्रकाशित झालीत. वाचकांनी त्याचे स्वागतही केले आणि कौतुकही केले.

 

सुनील इंदुवामन ठाकरेः वाचनाची गोडी कशी लागली किंवा विकसित झाली?
शैलेश पांडे: लायब्ररीचा, वाचनाचा व्यासंग मला वणीने शिकविला. आमच्या कॉलेजची लायब्ररी अत्यंत समृद्ध होती. विविध विषयांवर वाचायला मला आवडायचं. मी आजही वाचन करतोच. शेवाळकर सर प्राचार्य या नात्याने ग्रंथालय समृद्ध ठेवत. आम्हा विद्यार्थ्यांमध्ये गोडी वाढावी म्हणून सतत कार्यरत असत. पुढे पत्रकार झाल्यावर मला या वाचनाचा लाभ झाला. पत्रकारांना वाचन हे अनिवार्यच आहे, असं माझं मत आहे.

 

 

सुनील इंदुवामन ठाकरेः पत्रकारितेकडे कसे वळलात ?

शैलेश पांडे: त्या काळात वणी-मारेगावसारख्या गावांतून कुणी विद्यार्थी पत्रकारितेकडे करिअर म्हणून वळणे शक्यच नव्हतं. माझंही स्वप्न इंग्रजीचा प्राध्यापक होण्याचं होत. मी पत्रकारितेकडे चॉईसने नक्कीच वळलो नाही. तो केवळ एक अपघातच होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एम. ए. करण्यासाठी नागपुरला गेल्यावर वणीतील पांडुरंग कोल्हे, प्रभाकर पावडे, जयंत नरांजे, नेताजी राजगडकर या मंडळींच्या संपर्कात आलो. सध्या टाईम्स ऑफ इंडियात काम करणारा माझा एक सोबती श्रीकांत पाठक पत्रकारितेच्या क्षेत्रात होता. तेव्हा तो नागपूर पोस्ट या दैनिकात काम करायचा. तशीही मला आर्थिक चणचण होतीच. त्याच्यासोबत मी कधी कधी त्याच्या ऑफीसला जायचो. दैनिक महासागरला लिहायला सुरुवात केली. 1989ला जनवाद हे दैनिक लाँच झालं. तेव्हा डॉ. सतीश पावडे तेथे कार्यरत होते. शांताराम बोकील जनवादचे संपादक होते. जनवादला माझं सिलेक्शन झालं. कॉलेज आणि जनवाद हे दोन्ही सुरू ठेवलं. तिथून मला पत्रकारितेची गोडी लागली.

 

सुनील इंदुवामन ठाकरेः यातही आपल्याला बरीच धरसोड करावी लागली ?
शैलेश पांडे: माझं लग्न झालं होतं. पत्रकारितेत तेव्हा पगार कमी मिळायचा. आर्थिक अडचण भासत होती. मी मुंबई आकाशवाणी जॉईन केलं. लोकसत्ता 1992ला नागपूरहून सुरू झालं होतं. ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांनी मला लोकसत्ता जॉईन करायला सांगितलं. लोकसत्तासाठी माझं सिलेक्शन झालं. पूर्वीच्या 1500 रूपये पगाराच्या दुपटीपेक्षा अधिक 3500 रूपये पगार मिळायला लागला. आशा पल्लवीत झाल्यात. पुढे मी आकाशवाणीचं कामदेखील सोडलं. प्राध्यापकीचा नादही सोडला. मला स्टेट लेव्हलवर एक्सपोजर तिथूनच मिळालं. पुढे चालून मी वृत्तपत्रीय वाचनदेखील वाढवलं. मी 1992 ते 2003 पर्यंत लोकसत्ताला काम केलं. सुरुवात जनवादपासून झाली. पुढे लोकसत्ता, सकाळ, तरुण भारत, लक्ष्मणराव जोशी यांच्या नेतृत्त्वात लोकशाही वार्ता आणि पुन्हा सकाळ असा माझा प्रवास राहिला. आकाशवाणी पकडून ही माझी सातवी नोकरी आहे. या संघर्षाच्या आणि यशाच्या काळात प्राचार्य राम शेवाळकर आणि सुरेश द्वादशीवार यांचे मला खूप पाठबळ राहिलं. त्यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं.

 

सुनील इंदुवामन ठाकरेः पत्रकारिता, साहित्य आणि समाज कोणत्या दृष्टीने तुम्हाला परस्परपूरक वाटतात ?

शैलेश पांडे: साहित्यिक हा पत्रकार असो की नसो; पण पत्रकार हा मात्र साहित्यिक असतोच असं माझं मत आहे. पत्रकार हा सृजनशील असतोच, किंबहुना तो असावाच लागतो. साहित्यिक अंगाने केलेली पत्रकारिता ही अधिक परिणामकारक असते. साहित्य हे जीवनाचं प्रतिबिंबच असतं. त्यात कल्पनारम्यता, रंजकता, अतिरंजकता स्वाभाविकपणे येते. पत्रकारिता ही साहित्यिक अंगाने केली तरी ती काटेकोर असावी. वास्तवाचं भान ठेऊन मोजकं व नेटकं मांडणं हे पत्रकारितेतच अपेक्षित असतं. ग. त्र्यं. माडखोलकर, आचार्य अत्रे ही साहित्यिक मंडळीदेखील पत्रकार होती. साहित्याचा भविष्यवेध कदाचित जास्त प्रभावी असू शकतो. कला, साहित्य आणि पत्रकारितेतली अभिव्यक्ती ही निराळीच असते. त्यांना वेगळे रस, रूप व गंध असतात. एखादे साहित्य कधीतरी प्रकाशित होते. त्याच्या काही हजार प्रती निघतात. त्याचा वाचकवर्ग ठराविक असतो. त्याला मर्यादा असतात. याउलट दैनिकाच्या लाखो कॉपीज निघतात. त्यातही त्या दररोज निघतात. स्वाभाविकता त्याची व्याप्ती ही अधिकच असते.

ओलसावली या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

 

सुनील इंदुवामन ठाकरेः समकालीनतेवर आपला नेहमीच अधिक भर दिसतो.
शैलेश पांडे: साहित्य, कला व संस्कृती हे आपलं वैभव आहे. आपली संपत्ती आहे. पण यात काळानुरूप बदल आवश्यक आहे. नव्या काळाची भाषा, संदर्भ व समकालीन जीवनाचा उहापोह यात झाला पाहिजे. 1991 ते 2017 या प्रायव्हटायझेशनच्या कालखंडात प्रचंड उलथापालथ झाली. प्रचंड बदल झालेत व होत आहेत. पूर्वीच्या काळात वकील, मास्तर अथवा पटवारी जवळपास एवढ्याच नोकरीच्या अल्प मर्यादा होत्या. आज यात विविध संधी आल्यात. साधं कम्युटर किंवा इंटरनेट जरी गृहीत धरलं तरी त्यातील अनेक उपकक्षांतून अनेक रोजगाराच्या विभिन्न संधी आल्यात. सोबतच व्यसनाधिनता वाढत चालली. कौटुंबिक ताण-तणाव वाढलेत. माणूस आत्मकेंद्रित झाला. उपभोगवाद वाढला. चांगल्या व वाईटामधील बॅलेंस राखून साहित्यिक व पत्रकारांनी समाजाला सर्वोत्तम सार दिलं पाहिजे. इतिहास आणि वर्तमानाला तटस्थतेने भिडता आलं पाहिजे. व्यक्ती असो, संस्था असो, समाज असो किंवा काहीही असो आपल्याला कालानुरूप आपल्यात बदल घडवता आले पाहिजे.

 

सुनील इंदुवामन ठाकरेः नवतेचा तुम्ही आपण नेहमीच पुरस्कार करता, आपणास काय अपेक्षित आहे ?

शैलेश पांडे: नवीन पिढी सहसा वाचत नाही. त्यांना इंस्टंट आणि शॉर्टमध्ये सर्वकाही हवं आहे. मोबाईल, कम्प्युटर यावर ते शॉर्टमध्ये वाचतात. मोबाईलमुळे उलट माणसं दुरावलीत. नवं लिहिलं पाहिजे. नव्या काळाचं आपण दिलं पाहिजे. जुन्या झुलीतून बाहेर येणं अत्यंत आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर ‘फील गूड’चंच वातावरण आलं. साहित्य, कला व चित्रपटांतूनदेखील तेच बाहेर यायचं. तेव्हा जगणं हे सरळ रेषेतलं होतं. आता नवीन आव्हाने आलीत. नवीन प्रश्न आलेत. ते नव्याने मांडायलाच हवेत.

सुनील इंदुवामन ठाकरेः जाता जाता काय सांगाल ?

शैलेश पांडे: मी आधीच सांगितलं आहे. वर्तमान व वास्तवावर भाष्य झालंच पाहिजे. इतिहास आणि वर्तमान हे दोन्ही आपले संदर्भ आहेत. त्याचा पुरेपूर उपयोग मानवी उत्कर्षासाठी व अभ्युदयासाठी झालाच पाहिजे. साहित्य, पत्रकारिता हे जीवनाचेच प्रतिबिंब आहेत. त्यांचा यथायोग्य उपयोग झाला पाहिजे.

 

सुनील इंदुवामन ठाकरेः आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आमच्यासोबत चर्चा केली. वणी बहुगुणी डॉट कॉमच्या टीमच्या वतीने मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.

शैलेश पांडे: नमस्कार.

(हे पण वाचा: वणीतील नॅशनल लेव्हलची रायफल शुटर अंजली आवारी यांची एक्सक्लुझिव मुलाखत)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.