‘फकिरीचे वैभव’ पुस्तक पहिल्या पुरस्काराने सन्मानित

गाडगेबाबा मंडळाचा सेवा सामर्थ्य साहित्य पुरस्कार

0

सुनील इंदुवामन ठाकरे, दर्यापूरः संत गाडगेबाबांच्या विचारांवर चालणारे क्रांतिकारी नेते विजय विल्हेकर. त्यांचं ‘फकिरीचे वैभव’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलं. त्यांच्या या गाजलेल्या पुस्तकाला ‘सेवा सामर्थ्य साहित्य’ पुरस्कार जाहीर झाला. गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष प्रा. गजानन भारसाकळे यांनी त्यानिमित्त विल्हेकर यांचा घरी गौरव केला. मंडळाच्या राज्यस्तरीय ‘आई महोत्सवा’त हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

दर्यापूरच्या विवेकानंद स्मारक समिती आणि संत गाडगेबाबा मंडळाचा हा संयुक्त उपक्रम होता. ग्रंथलेखक विजय विल्हेकर यांना यापूर्वी अनेक पुरस्कार त्यांच्या कार्याकरिता मिळालेत. आम्ही सारे फाउंडेशनचा कार्यकर्ता पुरस्कार, निळू फुले कार्यकर्ता पुरस्कार, पुण्यातील ‘आपुलकी’ या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार उल्लेखनीय आहेत.

’फकिरीचे वैभव’ हे कार्यकर्त्याच्या अनुभवांची दाहक मांडणी आहे. यातील फकिरी वैभवापर्यंत जाते. एकेक मरणप्राय अनुभव जगण्याचं बळ कसे देतो, हे विल्हेकरांनी नेमके सांगितले आहे. या पुस्तकातील अनुभव हे केवळ लेखकाचे न राहता वैश्विक होतात. याची देही याची डोळा धावतं वर्णन. अत्यंत साधी सरळ आणि प्रवाही भाषा वाचकांना समरस करते.

हा तर वेदनांचा सन्मान

शेतकरी चळवळीतील अनुभवांनी हे पुस्तक समृद्ध आहे. तरीदेखील प्रत्येक चळवळीतील कार्यकर्त्याला हा स्वानुभव वाटावा इतकं हे पुस्तक जिवंत आहे. अमरावतीच्या बूक्स कट्टाचे संचालक प्रदीप पाटील(98608 31776) आणि मार्कोस विल्हेकर (8669189931) हे पुस्तकाचे वितरक आहेत. हा व्यक्तीचा पुरस्कार नसून वेदनांचा सन्मान आहे. गाडगेबाबांच्या नावाने चालणारी संस्थेचा पुरस्कार मिळतोय, याचा आनंद आहे.

गाडगेबाबांनी दिलेल्या दिशेने आम्ही चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यांनी दिलेली वाट सोपी नाही. तरी ती सत्याची आहे. विश्वकल्याणाची आहे. म्हणून आयुष्यभर ही धडपड सुरूच आहे. एक कार्यकर्ता म्हणून लढलो. लढत आहे. आलेले भले-बुरे अनुभव यात आहे. या पुस्तकातून आपल्याशी संवाद साधतोय. एवढंच.

विजय विल्हेकर, लेखक – ‘फकिरीचे वैभव’

 

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Leave A Reply

Your email address will not be published.