नवलेखकांना मिळालेत कथालेखनाचे ऑनलाईन धडे

कथालेखनाचे तंत्र व मंत्र यावर वर्षा किडे कुळकर्णी यांचे मार्गदर्शन

0

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: श्री शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन, मुक्ताईनगर आणि AVG Films & Production द्वारे आयोजित फेसबुक लाईव्ह पेजवरील कार्यक्रमात नागपूरच्या साहित्यिक व कथालेखिका वर्षा किडे कुळकर्णी यांनी “कथा लेखनाचे तंत्र व मंत्र” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन केले . हे निःशुल्क मार्गदर्शन प्रामुख्याने ज्यांनी नुकतीच कथालेखनाला सुरवात केलीय अशा नवोदित कथालेखकांसाठी, जे कथा लिहण्यास इच्छुक आहेत अशांसाठी आणि नवीन पिढीतल्या वाचकांसाठी होते.

“कथालेखनाचे तंत्र आणि मंत्र” या त्यांच्या व्याख्यानात त्यांनी साहित्य म्हणजे काय? कथा म्हणजे काय ? कथा व कादंबरी लेखनातला फरक, आजपर्यंतचा कथेचे स्वरूप, विषय,रचना, प्रकार, प्रवाह आणि शैली यांचा बदलता प्रवास, कथेचा इतिहास, सद्यस्थितीत कथेचे प्रारूप, कथेचे प्रकार, कथेच्या विषयाची व्याप्ती , उद्देश, आवाका,अभ्यास, कथा बीज ,कथेचा जन्म, कथेचा आराखडा, कथेचा प्रारंभ, मध्य ,शेवट, कथा लेखनाचा प्रकार, निवेदन शैली इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला.

कथेचा इतिहास सांगताना राष्ट्रीय, आणि जागतिक पातळीवर होत गेलेल्या प्रत्येक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, कौटुंबिक, आर्थिक परिवर्तनाचा परिणाम म्हणून कथेचे स्वरूप, विषय ,रचना ,शैली व प्रवाह यात कसेबसे बदल होत गेले हे समजावून सांगितलं.

कथेचा स्वातंत्र्यप्रातीपूर्वीचा, स्वातंत्र्योत्तर काळ ते आजच्या जागतिकीकरणाच्या काळापर्यंचा १०० वर्षांचा इतिहास त्यातील प्रत्येक परिवर्तनानुसार उलगडला. कथालेखनाबाबतचे इतरही सर्व मुद्दे त्यांनी अगदी साध्या, सोप्या भाषेत सोदाहरण स्पष्ट केलेत. त्यामुळे श्रोत्यांना विषय सुलभतेने कळला आणि श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

वर्षा किडे कुळकर्णी यांनी त्यांच्या कथा लेखनाचा प्रवास आणि वाचकांच्या प्रतिक्रियांचे काही हृदयस्पर्शी अनुभव श्रोत्यांना कथन केले. २००२ साली लिहलेल्या कथेतील कल्पनाशक्तीद्वारे रंगवलेला प्रसंग, घटना ही २०१८ साली प्रत्यक्षात जशीच्या तशी घडली होती. असा योगायोग ४ कथांच्या बाबतीत जुळून आल्याचं वाचकांच्या प्रतिक्रियांतून लक्षात आल्याचं त्या म्हणाल्या.

काही वाचकांनी त्यांच्या जीवनावर कथा लिहायचा प्रेमळ आग्रह केला, काहींनी आपली जीवनकहाणी भाषांतरासाठी तसेच शब्दांकनासाठी दिल्याचे त्यांनी सांगितलं. वाचकदेव त्यांच्यावर प्रसन्न आहे हे सांगताना कथांवर तळागाळातील सामान्य वाचकांच्या उस्फूर्त प्रतिक्रिया येतात असं त्या म्हणाल्या .

अनेक कथा लिहू इच्छिणाऱ्या लेखकांनी,नवोदितांनी , नवीन पिढीतील वाचकांनी या मार्गदर्शनासाठी त्यांचे मनापासून आभार मानले. जेष्ठ साहित्यिकांनी व्यासंगी , अभ्यासपूर्ण विवेचनासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं. फेसबुक लाईव्ह. कार्यक्रम असल्याने महाराष्ट्रातील आणि राज्याबाहेरील अनेक साहित्य प्रेमींनी या निःशुल्क मार्गदर्शनाचा लाभ घेतला. https://www.facebook.com/105555317648756/videos/308690327001173/?sfnsn=wiwspwa&extid=J8F1zRdONyXz1w4g&d=w&vh=e  या लिंकवर  वरील व्याख्यानाचा आपण कधीही लाभ घेऊ शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.