नागपूर: दुष्काळ आणि सततची नापीकी यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना महाबीजने जोरदार धक्का दिला आहे. सरकारी कंपनीचे बियाने दर्जेदार असणार या खात्रीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबिनचे बियाणे खरेदी केले. मात्र, महाबीजचं सोयबिनचं बियाणे चक्क बोगस निघाले आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, नागपूर जिल्ह्यातील घोगली गावात गुणवंत राऊत हा शेतकरी राहतो. राऊत यांनी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या योजनेअंतर्गत महाबीजकडून अनुदानित किमतीवर हे बियाणं खरेदी केलं होतं. त्यांनी पेरलेलं काही अपवाद वगळता एकाही बी उगवलं नाही. महाबीजच्या या धक्क्यातून शेतकरी अद्यापही सावरला नसून, तो हवालदिल झाला आहे.
महाबीजकडून फसगत झालेले राऊत हे काही एकमेव शेतकरी नाहीत. त्यांच्यासोबत घोगली गाव आणि परिसरातील सुमारे 23 शेतकऱ्यांना हा दणका बसला आहे. विशेषकरून महाबीजच्या सोयाबीनच्या 9560 आणि 9305 या प्रजातीच्या बियाण्यांबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
दरम्यान, सोयाबीनच्या 9560 आणि 9305 या प्रजातीच्या बियाण्यांबद्दल शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्याचे महाबिजनेही मान्य केले आहे. फसवणूक झाल्यामुले शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पैसे होते त्यांनी खाजगी कंपनीचं बियाणं घेऊन दुबार पेरणी केली. पण काही शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्यानं यंदा जमीन पडीक ठेवण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.
सरकारी कंपनी म्हणजे भरवशाची कंपनी. त्यामुळे असा भरवशाच्या कंपनीनेच जर धोका दिला तर, विश्वास कुणावर ठेवायचा हा सवाल या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.