सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: जिल्ह्यात कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या, मात्र न्यूमोनियासह इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची उपचारासाठी भटकंती होत आहे. रुग्णांचे उपचाराविना होत असलेले हाल थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक कडक नियमावली तयार करून त्याच्या काटेकोर पालनाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
अमरावती जिल्ह्यात व प्रमुख्याने शहरात न्यूमोनियाची भयंकर साथ आहे. यापैकी अनेक रुग्णांना डॉक्टर कोरोना चाचणी करायला सांगतात. पण कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही बहुतांश दवाखाने रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देतात. अशा रुग्णांना शहरातील दवाखान्यांमधून खासगी स्वरूपात चालवल्या जात असलेल्या कोविड रुग्णालयांची यादी दिली जाते. असे शिवराय कुळकर्णी यांचे म्हणणे आहे.
रुग्णांचे आप्त रुग्णाला घेऊन प्रत्येक हॉस्पिटलपर्यंत धावाधाव करतात. बेडची उपलब्धता नसल्याने त्यांना खासगी कोविड रुग्णालयातही दाखल करून घेतले जात नाही. इतर दवाखाने कोविड निगेटिव्ह असतानाही त्यांना घेत नाहीत आणि खासगी कोविड रुग्णालये तो रुग्ण पॉझिटिव्ह नाही म्हणून त्याला घेत नाही. रुग्णालयांनी नकार दिला म्हणून उपचाराविना मरणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे.
आधीच प्रकृती ढासळलेल्या रुग्णांच्या कोरोना चाचणीत अजूनही किमान दोन ते तीन दिवस जातात. नंतरही उपचार मिळण्याची खात्री नाही. काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना पॅकेज च्या नावाखाली रुग्णांची लूट सुरू झाली आहे. न्यूमोनिया रुग्णांना पाच हजारापासून ते पंचेचाळीस हजार रुपयांपर्यंतची इंजेक्शन दिल्याचे सांगून खासगी रुग्णालयांमध्ये किमान लाख रुपयांच्या खाली रुग्ण दुरुस्तच होत नाही.
या रुग्णालयांवर कोणाचाच अंकुश नसून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था निरंकुश झाली असल्याचा आरोप शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे. लक्षणे नसलेले कोविड रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने आपापल्या घरीच विलगिकरणात बरे होऊ शकत असताना केवळ भक्कम पैसा मिळतो म्हणून त्यांना खासगी कोविड रुग्णालयामध्ये ठेवले जात आहेत. यामुळे गंभीर रुग्णांना बेड मिळत नाही.
या संदर्भात रुग्णालयांसाठी एका नियमावलीची आवश्यकता आहे. अनेक डॉक्टर्स स्वतःच संभ्रमित आहेत. यात रुग्णांची हेळसांड होते आहे. कोविड मृत्यूंचा आकडा कमी दिसत असला तरी या परिस्थिमुळे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक मृत्यू होत आहेत. कोविड टेस्ट निगेटिव्ह असतानाही क्रिटिकल केअर हॉस्पिटल्स रुग्णांना घेत नसतील तर याला जबाबदार कोण ? शासकीय कोविड रुग्णालयात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयातही अशा अत्यवस्थ लोकांना मार्गदर्शन केले जात नाही.
अत्यंत बेजबाबदार उत्तरे दिले जातात. दिवसेंदिवस न्यूमोनिया रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने परिस्थिती आटोक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा आजारी असलेली खासगी व शासकीय आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्याची मागणी, शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.