खाणीच्या डोहात बुडून 15 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

मैत्रिणीने आरडाओरड केला पण वेळ निघून गेली होती....

विवेक तोटेवार, वणी: कपडे धुण्यासाठी खाणीत गेलेल्या एका मुलीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मोहदा गावालगतच्या खाणीत आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. विद्या अनिल आडे (15) असे मृत मुलीचे नाव आहे. विद्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहिती नुसार, विद्या ही तिचे आईवडील व भावासह मोहदा येथे राहत होती. तिचे वडील सालगडी म्हणून काम करतात. मोहदा गावालगत गिट्टीच्या खाणी आहेत. काही खाण बंद झाल्याने या खाणीत पाणी साचून याचे छोट्या तलावात रुपांतर झाले आहे. या पाण्याचा उपयोग परिसरातील काही लोक कपडे धुण्यासाठी करतात.

आज गुरुवारी दिनांक 4 एप्रिल रोजी विद्या ही तिच्या मैत्रिणीसह दुपारी 11.30 वाजताच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गावालगतच्या खाणीत गेली होती. कपडे धुवत असताना विद्याचा पाय घसरला व ती खाणीच्या डोहात पडली. विद्याला बुडताना पाहून तिच्या मैत्रिणीने आरडाओरड केला. त्यामुळे तिच्या वडिलांसह आजूबाजूचे काही लोक घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. या दुर्घटनेत विद्याचा बुडून मृत्यू झाला होता.

गावक-यांनी घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. विद्याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी खाणीच्या डोहात बुडून वणीतील 3 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या बंद खाणी अपघाताचे स्थळ बनत चालले आहे.

Comments are closed.