काँग्रेसच्या प्रचाराचे नारळ फुटले, गुंजला वारे पंजाचा नारा

रंगनाथ स्वामी मंदिरात पूजा करून अधिकृत प्रचाराला सुरुवात

बहुगुणी डेस्क, वणी: आज रंगनाथ स्वामी मंदिरात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेचे संजय देरकर यांनी नारळ फोडून प्रचाराला अधिकृतरित्या सुरुवात झाल्याचे जाहीर केले. यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्ष व इंडिया आघाडीच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगनाथ स्वामी मंदिरातील कार्यक्रमानंतर काँग्रेस व महाविकास आघाडीच्या विविध टीम शहरात व बाहेरगावी प्रचारासाठी निघाल्या.

प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसचे उशिरा तिकीट जाहीर झाल्याने त्यांच्या प्रचाराला देखील उशिरा सुरुवात झाली. मात्र तिकीट जाहीर होताच वणीतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात उत्साह संचारला. गावखेड्यात कॉर्नर बैठका व गृहभेटींचा सपाटा पदाधिका-यांनी लावला. तीन दिवसांआधी वणीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर झालेल्या सभेला देखील मित्र पक्षांच्या नेत्यांचा सहभाग दिसून आला.

वणीतील विविध भागात प्रचाराला सुरुवात
आज वणीतील जत्रा मैदान, खरबडा, गोकुळनगर, मोमिनपुरा, सर्वोदय चौक, खाती चौक इत्यादी भागात प्रचार करण्यात आला. प्रतिभा धानोरकरांच्या प्रचाराला सर्वसामान्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.

रंगनाथ स्वामी मंदिर येथील कार्यक्रमात वणी शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध पक्षातील नेते उपस्थित होते. यावेळी महिला आघाडी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. 

Comments are closed.